अनधिकृत फेरीवाले, मास्क व इतर दंडात्मक कारवाईतून जमलेल्या २८ लाख रुपयांपैकी २१ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर पोलिस ठाण्यात उघडकीस आला आहे. एवढी मोठी रक्कम लाटणाऱ्या न्यायालयीन कारकुनाचा किडनीच्या आजाराने मृत्यु झाल्याने ही रक्कम भरणार कोण, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अनधिकृत फेरीवाले, विना मास्क प्रकरणी करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईची रक्कम न्यायालयात जमा करावी लागते. ही रक्कम जमा करण्यासाठी संबंधित न्यायालयीन पोलिस कारकून याची जबाबदारी असते, तर न्यायालयात रक्कम जमा केली की नाही याची माहिती घेणे त्याची पावती स्वतःच्या ताब्यात घेणे ही जबाबदारी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (प्रशासन) यांची असते.मात्र गेल्या काही वर्षांपासून ही रक्कम न्यायालयात जमा न करता स्वतःसाठी खर्च केल्याचा प्रकार घाटकोपर पोलिस ठाण्यात उघडकीस आला आहे.
(हेही वाचा : महापालिकेच्या कोविड सेंटरमुळे ३०९ कुटुंबे घरापासून वंचित!)
नवीन कारकुनाची नियुक्ती झाल्यावर घोटाळा उघड!
घाटकोपर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दंडात्मक कारवाईतून गोळा झालेली तब्बल २८ लाख रुपयांची रोकड पैकी केवळ ७ लाख रुपये न्यायालयात जमा केली गेली असून २१ लाख रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. घाटकोपर पोलिस ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार जेव्हा ८ महिन्यापूर्वी न्यायालयात पोलिस कारकुनाची नवीन नेमणूक करण्यात आली. तेव्हा हा अफरातफरिचा प्रकार उघडकीस आला. या पूर्वीच्या पोलिस शिपाई कारकूनाने मागील दोन वर्षे २८ लाख पैकी केवळ ७ लाख रुपयेच न्यायालयात जमा केल्याचे समोर आले असून इतर २१ लाख रुपयांची रक्कम स्वत: हडप केली आहे.
‘त्या’ मृत पोलिस कारकुनाविरुद्ध गुन्हा दाखल!
रक्कम हडप करणाऱ्या कारकुनाचा आठ महिन्यापूर्वी किडनीच्या आजाराने मृत्यु झाला असून एवढी मोठी रक्कम आता भरणार कोण?, असा प्रश्न घाटकोपर पोलिसांना पडताच त्यांनी आजाराने मरण पावलेल्या पोलीस शिपाई कारकुनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्याकडे गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बोलून घ्यावे, असे आगरकर यांनी सांगून याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. पैशाची अफरातफर करणाऱ्या न्यायालयीन पोलिस कारकून यांच्याकडे वेळोवेळी न्यायालयात रक्कम जमा केल्याची पावती पोलिस निरीक्षक (प्रशासन) यांनी मागितली असती तर कदाचित ही अफरातफर रोखता आली असती, अशी चर्चा पोलिस ठाण्यात सुरू आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी यांच्याकडे विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची समजते.
(हेही वाचा : जेलमधून सुटलेल्या ‘भाईजान’ची काढली मिरवणूक!)
Join Our WhatsApp Community