पोलिसांकडून दोन कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द!

एकूण १४ गंभीर गुन्ह्यांतून हे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला होता.

107

चोरीला गेलेला ऐवज अथवा एखाद्या गंभीर गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल परत मिळेल का? असा प्रश्न तक्रारदारांना पडतो, तर अनेकजण चोरीला गेलेल्या ऐवजावर पाणी सोडून देतात. मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यांत मुंबईत घडलेल्या गुन्ह्यात तसेच उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा ऐवज मंगळवारी तक्रारदारांना परत केला. चोरीला गेलेले मंगळसूत्र, तसेच दागिने परत मिळाल्याचा आनंद मुद्देमाल परत घेण्यासाठी आलेल्या तक्रारदारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

New Project 1 13

मागील काही महिन्यातील जप्त केलेला माल तक्रारदारांना परत केला 

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिस दलाची धुरा हाती घेताच मुंबईत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्याचबरोबर गुन्हे उघडकीस आणून चोरीला गेलेल्या ऐवज अथवा मुद्देमाल जप्त करून तो तक्रादारांना परत मिळवण्यावर भर दिला आहे. मुंबईत मागील काही महिन्यात घडलेल्या गुन्ह्याची उकल करून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल, ऐवज तक्रारदारांना परत देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून कार्यक्रम राबवण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मध्य प्रादेशिक विभागातून करण्यात आली आहे. मंगळवारी मध्य प्रादेशिक विभागाच्या भायखळा येथील कार्यलयात हा मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

(हेही वाचा : 15 दिवसांत लोकल प्रवाशांची संख्या पोहोचली 31 लाखांवर!)

एकूण १४ गंभीर गुन्ह्यांत हस्तगत केलेले माल

या कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल तक्रादारांना परत करण्यात आला आहे. या मुद्देमालात सर्वाधिक सोन्याचे दागिने, महिलांचे मंगळसूत्रे, सोनसाखळीचा समावेश होता. एकट्या भायखळा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात सुमारे एक कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. तसेच दादर, सायन पोलिस ठाण्यातील फसवणूक, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी इत्यादी गंभीर गुन्ह्यातील २४ लाख असा एकूण १४ गंभीर गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने आणि सोन्याचे लगड असा सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला आहे. याप्रसंगी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि पोलिस आयुक्त तसेच सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम पार पडला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.