चित्रीकरणासाठी वेळ वाढवून देण्याचा अधिकार आता पोलिसांना!

चित्रीकरण पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, त्यांचे लसीकरण होईल हेही पहावे, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

70

चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही, मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

चित्रीकरण पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, त्यांचे लसीकरण होईल हेही पहावे, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल, अशी ग्वाही दिली. या बैठकीस हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. आदेश बांदेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे देखील सहभागी होते. गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत, परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे, सायंकाळी 4 नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे, असे प्रोड्युसर गिल्डचे म्हणणे होते.

(हेही वाचा : रश्मी ठाकरे होऊ शकतात मुख्यमंत्री…)

पथकाचे लसीकरण व कोरोना तपासणी आवश्यक!

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही, पण महाराष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. संरक्षित अशा बायो बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे. निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे आणि सुरक्षितरित्या ते उठविण्याबाबत राज्य शासन पाऊले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.