राज्यात लवकरच २० हजार पदांसाठी पोलीस भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

169

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलात लवकरच २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून, आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

( हेही वाचा : अनिल अंबानींना करचुकवेगिरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा! )

गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक घेण्यात आली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव गृह विभागाने तातडीने शासनास सादर करावेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्वाचा असून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.

या बैठकीला अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, प्रधान सचिव (सुरक्षा) संजय सक्सेना, प्रधान सचिव (अपिल आणि सुरक्षा) शाम तागडे, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कुलवंत कुमार सरंगल, अमितकुमार सिंग, अर्चना त्यागी, सह पोलीस आयुक्त, मुंबई विश्वास नांगरे-पाटील, राजवर्धन, राजकुमार व्हटकर यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस भरतीला प्राधान्य

राज्यामध्ये सध्या सन २०१९ मधील ५ हजार २९७ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू आहे. सन २०२० मधील ७ हजार २३१ पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरू आहे. याबरोबरच सन २०२१ अखेर रिक्त होणाऱ्या १० हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या १० हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच अन्य रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.