वरिष्ठ पोलीस निरीक्षक याच्या कॅबिनमध्ये पोलीस अधिकाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घाटकोपर येथे सोमवारी रात्री घडली, या अधिकाऱ्याला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाणे नोंदवहित करण्यात आली आहे.
बाळकृष्ण नाणेकर असे विषारी द्रव प्राशन करणाऱ्या अधिकारी याचे नाव आहे. नाणेकर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाटकोपर पोलीस ठाण्यात तैनात होते. पंधरा दिवसापूर्वी त्यांची बदली पुणे येथे झाली होती. बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्यातून लवकरात लवकर सोडण्यात यावे अशी विनंती घेऊन नाणेकर हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे अनेक वेळा गेले होते मात्र त्यांना सोडले जात नव्हते. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नाणेकर पुन्हा एकदा घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांच्या कॅबिनमध्ये गेले व मला कार्यमुक्त करण्यात यावे अशी विनंती केली, परंतु वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांना तुमच्या कडे असलेल्या गुन्ह्यातील कागदपत्रे अगोदर ताब्यात द्या त्यानंतर कार्यमुक्त करू असे त्यांना सांगितले.
परंतु तुम्ही अगोदर कार्यमुक्त करा त्यानंतर मी कागदपत्रे जमा करतो असे नाणेकर यांनी वरिष्ठ अधिकारी यांना सांगितले, यातून नाणेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यात वाद झाला या वादातून नाणेकर यांनी सोबत आणले फिनाईल हे विषारी द्रव्य वरिष्ठ निरीक्षक त्यांच्यासमोरच प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नाणेकर यांना तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाणे डायरीत करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपयुक्त दर्जाचे अधिकारी करीत आहे.
(हेही वाचा BMC : भटक्या श्वानांच्या नसबंदीचे प्रमाण होतेय कमी; मागील वर्षांत सर्वांत कमी झाले निर्बिजीकरण)
Join Our WhatsApp Community