Political Banner : न्यायालयाची बंदी, तरीही मुंबईत राजकीय पक्षाची बॅनरबाजी जोरात!

482
Political Banner : न्यायालयाची बंदी, तरीही मुंबईत राजकीय पक्षाची बॅनरबाजी जोरात!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

राजकीय बॅनर आणि फलकांवरील निर्बंध न्यायालयाने घातल्यानंतरही मोठ्याप्रमाणात राजकीय पक्षाच्यावतीने तसेच नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात येत आहे. मात्र, या राजकीय फलक आणि बॅनरवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसून यामध्ये सत्ताधारी पक्षाच्यावतीनेच जास्त फलक लावले जातात आणि या फलकांवर कारवाई करताना प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. त्यामुळे एकप्रकारे न्यायालयाच्या निर्देशाचे अवमुल्यन होत असून मुंबईला विद्रुप करणाऱ्या या जाहिरातींवर कधी कडक कारवाई होणार असा सवाल केला जात आहे. (Political Banner)

मुंबईत निवडणूक आचारसंहिता काळात बॅनर आणि फलक मुक्त झालेल्या मुंबईत आचारसंहिता संपल्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यानंतर सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आणि तसेच त्यांचे खातेवाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. परंतु या फलकावर महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. सहा डिसेंबरनंतर मुंबईत लावलेले सर्व राजकीय फलक आणि बॅनरवर कारवाई करण्यात आली होती. परंतु महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावलेले विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांचे फलक काढण्यात आले असले तरी त्यानंतर मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर तसेच विधीमंडळ अधिवेशनानंतर खातेवाटप झाल्यानंतर मंत्री महोदयांना शुभेच्छा देणारे तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत. परंतु हे बॅनर आजही अनेक रस्त्यांवर, चौकांवर आणि विजेच्या पोलवर झळकत आहेत. (Political Banner)

(हेही वाचा – Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली)

दादर शिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक एक वा दोन नसून रांगेमध्ये पाच ते सहा झळकत आहेत. तर वांद्रे पूर्व भागांमध्ये शिवसेना नेते व आमदार अनिल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक सर्वत्र झळकत आहे. राजकीय बॅनर व फलक लावण्यास न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातलेली असून अनेकदा या राजकीय जाहिरातबाजींप्रकरणी महापालिका परवाना विभागाने नोटीस बजावल्या. तसेच न्यायालयानेही अनेकदा राजकीय पक्षांच्या नेत्यांची कानउघडणी करून तसेच त्यांना नोटीस बजावूनही राजकीय जाहिरातबींना आळा बसलेला नाही. उलट जे राजकीय बॅनर व फलक लावले जात आहेत, ते हटवण्यात महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. (Political Banner)

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राजकीय पक्षाच्या बॅनर व फलकांना बंदी असली तरी प्रत्यक्षात हा प्रकार कमी झालेला नाही, परिणामी मुंबईला विद्रुपता प्राप्त होत आहे. याप्रकरणी वारंवार राजकीय पक्षांना नोटीस बजावून त्यावर कारवाई करून याची माहिती न्यायालयाला सादर केली जाते तसेच दंडात्मक कारवाई केली जाते. पण त्यानंतर कोणताही परिणाम दिसून येत नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये कोणतीही भीतीच न राहिल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक वॉर्डांमध्ये लावलेले फलक आणि बॅनर जर सत्ताधारी पक्षाचे असतील तर ते काढताना अधिकारी घाबरतात. त्यामुळे अशाप्रकारच्या बॅनरचा आधार घेत अन्य पक्षांच्यावतीने बॅनर व फलक लावले जातात. त्यामुळे राजकीय पक्षांना भीती वाटेल अशाप्रकारे ठोस कारवाई झाली तरच मुंबईला विद्रुप करणारे बॅनर व फलक लागणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Political Banner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.