चौपाटी स्वच्छता मोहिमेत पीओपी मूर्तींमुळे पडतेय जलप्रदूषणात भर

अकरा दिवसांच्या गणपतीला निरोप दिल्यानंतर आता चौपाटी स्वच्छता मोहिमेत पुन्हा पीओपी आणि प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. पीओपी मूर्तींमुळे समुद्रातील स्वच्छता मोहिमेला पुन्हा आव्हान उभे राहिल्याची खंत चौपाटी स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

अनंत चतुर्दशीनंतर शनिवारी आणि रविवारी चौपाटी स्वच्छता मोहिमेत अनेक स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. दूध, तेलाच्या पिशव्या, बिस्कीट आणि वेफर्सचे रॅपर्स आदी प्लास्टिकच्या पिशव्यांचा समुद्रात कचरा जास्त झाल्याचे निरीक्षण स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांनी नोंदवले आहे.

(हेही वाचाः उद्यानात बिबट्यांचा व्हिडिओ चोरीछुपे काढला, समाजमाध्यमांवर फिरणा-या व्हिडिओचे जाणून घ्या सत्य)

निसर्गप्रेमींचा आक्षेप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पर्यावरण शाखेच्यावतीने मुंबईत गिरगांव, मार्वे तर राज्यात होणा-या नदी-नाल्यांतील गणपती विसर्जनानंतर होणा-या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवण्यात आला. यंदाही पीओपीला मुंबईत परवानगी दिली गेल्याने निसर्गप्रेमींनी आक्षेप नोंदवला. शनिवारपासून समुद्रात पूर्ण न विरघळलेल्या मूर्ती आम्हाला सापडत असल्याची माहिती मनसेच्या पर्यावरण शाखेचे अध्यक्ष जय श्रुंगारपुरे यांनी दिली.

गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही पीओपी गणेशमूर्ती बंद होऊन केवळ निसर्गप्रेमी गणेशमूर्तीच उत्सव काळात निर्माण होतील, ही आश्वासने ऐकत आहोत. वाढत्या जलप्रदूषणाचा आलेख पाहता सर्व स्तरांवरून कार्यवाही अपेक्षित असल्याचे मतही श्रुंगारपुरे यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयांचाही सहभाग

जुहू चौपाटीवर आयोजित स्वच्छता मोहिमेतही शंभराहून अधिक पीओपी मूर्तींच्या गणेशमूर्ती आढळून आल्या. या मूर्ती स्वच्छता मोहिमेत सहभागी कार्यकर्त्यांनी गोळा करुन पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या हवाली केल्या. जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेत वांद्रे येथील नॅशनल कॉलेज तसेच पाटकर आणि एस.एम.शेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here