दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील खड्ड्यांची जोरदार चर्चा असली तरी यंदाच्या पावसाळ्यात मात्र याची कोणत्याही प्रकारची चर्चा दिसून येत नाही. आजवर हा महामार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात होता. त्यामुळे शीव ते मुलुंड या पूर्व द्रुतगती महामार्गावर पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांंमुळे महापालिकेला टिकेचे लक्ष्य केले जात असे, परंतु यंदा हा महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर यावरील खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेने स्वतंत्र संस्थेची नेमणूक केल्यानंतर या मार्गावरील पुलाखालील भाग, सेवा, रस्ते यांवरील खराब झालेले भाग महापालिका प्रशासन दुरुस्त करण्यात यशस्वी ठरल्याने यंदा प्रथमच हा महामार्ग खड्डे मुक्तीच्या दिशेन वाटचाल करत खड्डयांच्या शापातून मुक्त होत असल्याचे दिसत आहे.
मुंबईतील मुलुंड ते शीव हा पूर्व द्रुतगती महामार्ग १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद आहे. नोव्हेंबर २०२२ पासून मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत याचे महापालिकेला हस्तांतरण करण्यात आल्यानंतर याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारलेली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या महामार्गावर खड्डे पडू नये याची जबाबदारी महापालिकेची असल्याने त्यांनी या महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी के आर कंस्ट्रक्शन कंपनीची निवड केली. या मार्गावरील खड्डे तथा खराब भागांची सुधारणा करण्यासाठी विविध करांसह ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मुलुंड पासून शीव पर्यंतच्या या मार्गावरील विविध भागांमधील खड्डे तसेच खराब भागांची मलमपट्टी करत सुधारणा करण्याचे काम युध्दपातळीवर करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या मार्गावरील खड्डयांचे शुक्लकाष्ट कमी झाल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा Ajit Pawar :अजित पवार गट राज्यभरात ताकद वाढवणार
या मार्गावरील मुलुंड टोल प्लाझा, सांताक्रुझ घाटकोपर लिंक रोडचा उत्तरेकडील भाग, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील दक्षिण व उत्तरेकडील भाग,भांडुपचा उत्तरेकडील भाग, छेडा नगर येथील उत्तरेकडील भाग, छेडा नगर जंक्शन, मुलुंड टोल नाका दक्षिणेकडील भाग, वांद्रे कुर्ला उड्डाणपुलाचा दक्षिणेकडील आणि चुनाभट्टीच्या अलिकडील भाग एवरार्ड नगर, नवघर उड्डाणपूल उत्तरेकडील भाग, कामगार नगर उत्तरेकडील भाग, ऐरोली उड्डाणपूल, टागोर नगर दक्षिणेकडील भाग, अमर महल उड्डाणपुलाच्या अलिकडील भाग, विक्रोळी पादचारी पुलाशेजारी पूर्व बाजुस, रमाबाई नगर उत्तरेकडील भाग, अंधेरी घाटकोपर लिंड रोड उत्तरेकडील भाग, कुर्ला सिध्दार्थ नगर सेवा रस्ता, ऐरोली पुलाखालील भाग आदी भागांमधील छोट्या मोठ्या खड्डयांची तसेच खराब झालेल्या रस्त्यांवर मास्टिक अस्फाल्ट तसेच इतर तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला गती देऊन हा मार्ग वाहतूक सुरळीत राखण्याच्यादृष्टीकोनातून अत्यंत चांगल्याप्रतीचा बनला आहे. पावसाळ्यात काही भागांमध्ये खड्डे बुजवण्यात विलंब झाला असला तरी पावसाने ब्रेक घेतल्याने याचा फायदा उठवत संबंधित नेमलेल्या कंपनीने सर्वच भाग दुरुस्त करून खड्डेमुक्तीच्या दिशेने या मार्गाची वाटचाल करून दिली आहे.
वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पुष्टभाग चांगल्या स्थितीत निर्माण करतानाच सेवा रस्त्यांची सुधारणा, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांवरील फ्रेम कव्हर, आरसीसी ढापा, तसेच पदपथांची सुधारणा आदी कामेही याअंतर्गत करण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराने प्रयत्न केले आहे. जेणेकरून हा महामार्ग यंदा खड्डेच नाही तर तुटलेल्या ढापा आणि गटारांची कव्हर यामुळेही सुरक्षित झालेला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डयांचा आढावा घेताना मुंबईतील यासर्व मुख्य रस्ते आणि सेवा रस्ते याठिकाणी खड्उ राहणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना करत प्रत्येक नियुक्त संस्थेवर जबाबदारी निश्चित करून दिली होती. त्यामुळे पावसाने उघडीप घेतल्याने प्रत्येक संस्था आता खड्डे बुजवण्याच्या कामांसाठी विशेष लक्ष घालून काम करत असल्याचेही दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community