मुंबई शहरातील शीव तलाव, पूर्व उपनगरातील कुर्ला येथील शितल तलाव आणि पश्चिम उपनगरातील डिगेश्वर तलावांतील पाणी प्रदूषित होत आहे. पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त तलावांमध्ये जाणारे पाणी अडवून त्यातील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. त्यामुळे यासाठी महापालिकेच्यावतीने या जल प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जात आहे.
मुंबईतील सर्वात मोठे तलाव असलेल्या पवई तलावामधील प्रदूषित पाणी रोखण्यासाठी यापूर्वी महापालिकेने सल्लागाराची नेमणूक केली होती, तसेच त्याची कामेही हाती घेतली. परंतु आजतागायत पवई तलावातील जल प्रदूषण रोखण्यात महापालिकेला यश आलेले नाही. पवई तलावाला प्रदुषणमुक्त करू न शकणाऱ्या महापालिकेने आता राष्ट्रीय हरित लवादाच्या भीतीने सल्लागार नेमून मुंबईकरांना हे तलाव प्रदुषणमुक्त करण्याची स्वप्ने दाखवली आहेत.
(हेही वाचाः आयुक्त, कंत्राटे आणि भ्रष्टाचार!)
१ कोटी रुपयांचे सल्लागार शुल्क
मुंबईतील शीव, शीतल आणि डिगेश्वर तलावात आणि जलाशयात प्रवाहित होणाऱ्या बिनपावसाळी अंतर्गत प्रवाहाचे पाणी दुसरीकडे वळवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर अभ्यास करुन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेच्यावतीने सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हा अहवाल तयार करून घेतल्यानंतर, त्यानुसार प्रत्यक्ष काम झाल्यावर या तलावात होणारे प्रदूषण थांबवण्यात येईल व आजूबाजूच्या परिसरातील वातावरण आरोग्यदायी होण्यास मदत होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या तिन्ही तलावांचा अभ्यास करण्यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सल्लागार म्हणून निवड केली आहे. यासाठी सुमारे १ कोटी रुपये सल्ला शुल्क मोजले जाणार आहे.
(हेही वाचाः शुल्क सवलतीच्या निर्णयावरून आता अधिकाऱ्यांमध्येच गोंधळ!)
हरित लवादाची विचारणा
हरित लवादाने महापालिकेला दिलेल्या निर्देशात प्रक्रियाकृत सांडपाणी वापराबाबत कृती आराखडा तयार करुन सादर करण्यास सांगितले. हरित लवादाने २८ ऑगस्ट २०१९च्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेकडून पर्यावरणाच्या नुकसान भरपाईसाठी जास्तीत-जास्त रक्कम म्हणजे, एकूण भांडवली २०० कोटी रुपये आणि त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रतिदिन २० लाख रुपये का आकारू नये, अशी विचारणा केली आहे.
म्हणून सल्लागाराची निवड
तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मुंबईमधील नद्या व तलाव किंवा खाडी यांमध्ये बिनपावसाळी अंतर्गत प्रवाह, सांडपाणी, विना प्रक्रिया मलप्रवाह किंवा अर्धवट प्रक्रिया केलेले मलप्रवाह येऊन नद्या, तलाव किंवा खाडीतील पाण्याचे प्रदूषण होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला केले आहेत. त्यानुसार महापालिकेने या तीन तलावांमधील प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची निवड केली असल्याचे मलनि:स्सारण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या श्रेयात राष्ट्रवादीचीही हिस्सेदारी! शुभारंभास पवार उपस्थित राहणार)
Join Our WhatsApp Community