पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी बॅंक खाते असावे, म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना ‘प्रधानमंत्री जनधन’ या नावाने सुरू केली. या योजनेला आता सामान्यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करतानाही राज्यतील सर्वसामान्यांनी विशेषत: महिलांनी जनधनच्या माध्यमातून 10 हजार 61 कोटींची बचत केली आहे.
या जिल्ह्यांत सर्वाधिक खाती
2019-20 च्या तुलनेत सध्या जनधन खात्यात तब्बल 2 हजार 575 कोटींची रक्कम वाढली आहे. ठाणे, पुणे, वाशिम, नगर, बीड, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यांमधील खात्यात सर्वाधिक रक्कम जमा आहे, असे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आले आहे.
मागच्या साडे सात वर्षांत करोडो खाती उघडली गेली
अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री अपघात विमा योजनांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ त्यांना बॅंकांच्या माध्यमातून थेट मिळावा, या हेतूने 15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना सुरु केली. मागच्या साडेसात वर्षांत राज्यातील 3 कोटी 9 लाख 96 हजार 500 व्यक्तींनी शून्य रुपयांत जनधन खाती उघडली आहेत.
( हेही वाचा: पुन्हा धावू लागली एसटीची चाके, इतके कर्मचारी झाले कामावर हजर )
कोण उघडू शकतो जनधन खाते
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते सार्वजनिक क्षेत्रातील बँक, खाजगी क्षेत्रातील बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. जर तुमचे दुसरे बचत खाते असेल, तर तुम्ही ते जनधन खात्यात रूपांतरित करू शकता. भारतातील कोणताही नागरिक ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे तो जनधन खाते उघडू शकतो. या योजनेद्वारे देशातील अधिकाधिक नागरिकांना बँकिंग प्रणालीशी जोडता येईल. हे खाते उघडल्यानंतर ग्राहकांना 1लाख 20 हजार रुपयांचा विमाही मिळतो. ज्यामध्ये नॉमिनीला मृत्यूनंतर 1 लाख रुपयांची रक्कम मिळते.
Join Our WhatsApp Community