Prayagraj Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथील परिस्थिती नियंत्रणात; योगी आदित्यनाथ यांची माहिती

61
Prayagraj Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथील परिस्थिती नियंत्रणात; योगी आदित्यनाथ यांची माहिती
Prayagraj Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथील परिस्थिती नियंत्रणात; योगी आदित्यनाथ यांची माहिती

महाकुंभास्थळी सध्या 8-10 कोटी लोक आहेत. प्रशासनावर दबाव आहे; पण परिस्थिती नियंत्रणात आहे. हा सोहळा सर्वांसाठी आहे. त्यांची सेवा करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जर कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याने नुकसान होऊ शकते. संगम नोज, आखाडा मार्ग आणि नाग वासुकी मार्गावर भाविकांच्या गर्दीचा प्रचंड दबाव आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिली आहे. मौनी आमावास्येच्या निमित्ताने कुंभपर्वात (Prayagraj Kumbh Mela 2025) अमृत स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने २८ जानेवारीच्या रात्री चेंगराचेंगरी झाली. याविषयी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, रात्री १ ते २ च्या दरम्यान आखाडा मार्गावरील बॅरिकेड्स ओलांडताना काही भाविक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या प्रयागराजमध्ये ८ ते १० कोटी भाविक आहेत. काल साडेपाच कोटी भाविकांनी महाकुंभामध्ये स्नान केले होते; पण संगम नोज या घाटावर सतत भाविकांची गर्दी असते; पण तिथे आवश्यक ती काळजी घेण्यासाठी प्रशासन तिथे उपस्थित आहे. भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये. संयम बाळगा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

प्रयागराजमध्ये (Prayagraj) गर्दीचा प्रचंड दबाव आहे. संगम नाकावर आंघोळ करण्याची गरज नाही. पुजेनंतर भक्त स्नान करतात. जेव्हा गर्दी कमी असेल, तेव्हा संतांचे स्नान होईल. जवळच्या घाटांवर स्नान करा. गंगेवर १५ ते २० किलोमीटरच्या परिघात तात्पुरते घाट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे संगमावर येण्याचा आग्रह न धरता तुम्ही जिथे आहात, तिथे स्नान करा. संगमाच्या दिशेने येणे टाळा. स्थानिक पातळीवर सुरक्षित स्नान उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचे लक्ष केंद्रित आहे, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना आश्वस्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील उपस्थित होते, असे योगी आदित्यनाथ या वेळी म्हणाले. (Prayagraj Kumbh Mela 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.