-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या सर्व लोखंडी तुळ्या (गर्डर) प्रकल्पस्थळी दाखल झाल्या आहेत. तीन टप्प्यात उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या पहिल्या टप्प्यात सहा तुळया (गर्डर) टाकण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन टप्प्यांचे काम प्रगतिपथावर असून, येथे दोन टप्प्यांत एकूण १२ तुळ्या (गर्डर) टाकण्यात येणार आहेत. दरम्यान, या पुलाच्या पूर्व बाजूचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, पश्चिम बाजूचे काम सुरू आहे. तसेच, पश्चिम बाजूच्या ऍप्रोचेसचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मे २०२५ अखेर हा पूल रहदारीसाठी खुला करण्याचे महानगरपालिकेचे अपेक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Vikhroli Bridge)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईकर नागरिकांचा प्रवासात कमीत कमी वेळ खर्ची व्हावा, यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, लोहमार्गावर तुळ्या टाकून पूल उभारणे, रस्त्यांची गुणवत्ता उत्तम असावी यासाठी सिमेंट क्राँकिटच्या रस्त्यांची बांधणी करणे आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. याच अनुषंगाने विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात मध्य रेल्वे मार्गावर पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाची मुख्य तुळई (गर्डर) टाकण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. (Vikhroli Bridge)
(हेही वाचा – गर्डर हटवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन Special Block; पहा वेळापत्रक )
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वे मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी मुंबई महानगरपालिका करीत आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्य रेल्वेकडून करण्यात येणार आहे. या पुलावर टाकण्यात येणाऱ्या तुळ्या (गर्डर) सुमारे २५ मेट्रिक टन इतक्या वजनाच्या आहेत. तसेच या तुळ्यांची लांबी २५ ते ३० मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत ह्या तुळया (गर्डर) टाकण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्प्यांत ६ अशाप्रकारे तीन टप्प्यांत एकूण १८ तुळ्या (गर्डर) टाकण्यात येणार आहेत. या पैकी पहिल्या टप्प्यातील ६ तुळ्या यशस्वीपणे टाकण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन टप्प्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत. (Vikhroli Bridge)
सध्या पुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १५ टक्के काम मे २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंतच्या परिघातील वाहनधारकांनाही या पुलाचा उपयोग होणार आहे. शाळा आणि रेल्वे स्थानक असे सातत्याने रहदारी असलेले परिसर जवळ असल्याने अतिशय दक्षता घेत महानगरपालिकेचे मनुष्यबळ या ठिकाणी काम करीत आहे. (Vikhroli Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community