अंधेरी लोखंडवाला येथे नैसर्गिकरित्या तलाव निर्माण झाला असून, त्याठिकाणी शंभरपेक्षा अधिक स्थलांतरित पक्षी येत आहेत. त्यामुळे त्यांचा अधिवास सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवा
अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला तलावाची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी २८ मे रोजी पाहणी केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश देताना महापौर बोलत होत्या. अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला तलावातील गाळ काढून हा तलाव नैसर्गिकरित्या जतन करुन त्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवावे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
(हेही वाचाः मुंबईतील ‘बॅरोमीटर बुश’ ला आला फुलोरा… काय आहे फुलांचे वैशिष्ट्य? वाचा…)
शंभरपेक्षा अधिक स्थलांतरित पक्षी
यावेळी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, नैसर्गिकरित्या हा तलाव तयार झाला असून हा तलाव जसा आहे त्याच पद्धतीने त्याचे संवर्धन झाले पाहिजे. येथील पर्यावरणप्रेमी नागरिकांची ही मागणी असून त्याप्रमाणेच मुंबई महापालिकेने आवश्यक त्या भागातील गाळ काढून या तलावाचे संवर्धन करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे या ठिकाणी विदेशातून शंभरपेक्षा अधिक स्थलांतरित पक्षी येत असून, त्यांचा अधिवास सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.
स्वतंत्र बजेट
त्यासोबतच या सर्व कामांना ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी, पश्चिम उपनगरे, खारफुटी संवर्धन सेल यांची संयुक्त बैठक महापौर दालनात घेण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. पाण्यातील जलचर तसेच निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र बजेट हेड मधून हे सर्व काम करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. तसेच या संपूर्ण कामांमध्ये स्थानिक पर्यावरण प्रेमी नागरिकांचा सहभाग घेऊन त्यांच्या सूचनांप्रमाणे येथील कामाला गती देण्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी बाजार व उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, माजी नगरसेवक शैलेश फणसे, के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे तसेच संबंधित महापालिका अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
(हेही वाचाः महापौरांकडून आपल्याच समिती अध्यक्षाला कात्रजचा घाट)
Join Our WhatsApp Community