संपूर्ण जगाचे आर्थिक गणित बिघडवणा-या कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या वर्षभरात जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. परंतु ही मोहिम केवळ कोरोनापूरतीच मर्यादित न राहता आता भारतानेही प्रौढ लसीकरणा ही संकल्पना दृढ करायला हवी, असा विचार वैद्यकीय क्षेत्रातून दिला जात आहे. परदेशाच्या तुलनेत भारतात लसीकरण मोहिम प्रौढ वयोगटात फारशी प्रचलित नाही आहे, त्यामुळे प्रौढांमध्ये विविध आजारांशी संबंधित प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबवायला हवी, यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जोर दिला आहे. जगाच्या तुलनेत भारतात ५ टक्केही प्रौढ लसीकरण मोहिम राबवली जात नसल्याची खंत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
( हेही वाचा : ‘गेट वे ऑफ इंडिया’ लखलखणार, हे आहे कारण! )
दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात कोरोना हा संसर्गजन्य आजार महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. त्यानंतर हा आजार कित्येक देशांमध्ये जीवघेणा ठरला. किमान दोन लाटांचा सामना केल्यानंतर बहुतांश देशांनी मृत्यूदर कमी होण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर द्यायला सुरुवात केली. यात विकसित देशापासून ते विकसनशील देशांचाही समावेश आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर इतर आजारांना प्रतिबंध घालणा-या लसीकरणाबाबत जनजागृती हवी, असे मत खार येथील हिंदुजा रुग्णालयाचे संचालक डॉ अविनाश सुपे यांनी दिले. तुम्ही आरोग्यक्षेत्रासारख्या संवेदनशील क्षेत्रात काम करत असाल तर कोरोना लसीकरणासह इतर लसीकरणही पूर्ण असायला हवे, अशी माहिती डॉ सुपे यांनी दिली. यात हेपेटायटीस आणि इन्फ्लूएन्झा या लसीकरणांचाही समावेश आहे. प्रवासादरम्यान, तापासारखे आजार टाळण्यासाठीही इन्फ्लुएन्झा लस लाभदायक असते, असेही डॉ सुपे म्हणाले.
अमेरिकेसारख्या देशांत लसीकरण मोहिम चांगल्या प्रकारे राबविली जाते. यात प्रामुख्याने इन्फ्लुएन्झा लसीकरणाचा चांगला प्रचार झाला आहे. ही लस अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला दिली जाते. त्याचप्रमाणे प्रौढांमधील आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी इतर प्रतिबंधात्मक लसींकरणावरही पाश्चात्य देश चांगलेच प्रयत्नशील असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संघटनेचे सचिव डॉ जयेश लेले यांनी दिली.
प्रौढ लसीकरण हा हवे
आता साठीपार वयोगटात उच्च रक्तदाब, मधुमेह, यकृत, हृदय तसेच मूत्रपिंडाचे आजार वाढत आहेत. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारत मधुमेहग्रस्त रुग्णांचा जीव वाचवणे डॉक्टरांसाठी फारच आव्हानात्मक ठरले. त्यामुळे प्रौढ लसीकरणावर आता लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मत आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले.
प्रौढांसाठी कोणकोणत्या आजारांवर लसीकरण उपलब्ध आहे, जाणून घ्या…
– हेपेटायटीस ए आणि बी – हेपेटायटीस ए हा यकृताशी संबंधित आजार दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने होतो. हेपेटायटीस बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही हा आजार पसरण्याची भीती असते. या आजाराची तीव्रता सौम्य ते गंभीर स्वरुपातही दिसून येते. हा आजार बरा होतो. प्रौढांमध्ये हा आजार उद्भवल्यास कित्येकदा गंभीर लक्षणे आढळून येतात. याआजारावर वेळीच उपचार सुरु न केल्यास कित्येकदा यकृत निकामीही होते. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लसही उपलब्ध आहे.
भारतात यकृत निकामी होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये हेपेटायटीस बी हा आजार प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. लैंगिक संबंधातून, टॅटू काढताना किंवा अंमली पदार्थ सूई टोचून घेतल्यास हेपेटायटीस बीचा आजार उद्भवतो. हा आजार वेळेवरच नियंत्रणात आणल्यास इतर जीवघेणे आजार होण्याचीही भीती असते. हेपेटायटीस बीच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे.
व्हेरिसेला- ही लस कांजण्यांचा संसर्ग प्रतिबंधासाठी दिली जाते. ही लस दोनवेळाच दिली जाते. लहान मुलांप्रमाणेच प्रौढांमध्येही कांजण्याचा आजार दिसून येतो. त्यामुळे ही लस प्रौढांनी घ्यावी, असा सल्ला दिला जातो.
इन्फ्लुएन्झा – तापासारख्या आजारापासून वाचण्यासाठी ही लस महत्त्वाची ठरते. ही लस दरवर्षाला.तरी नक्की घ्यावी
न्यूमॉकॉकल – न्यूमोनिया आजार रोखण्यासाठी ही लस घेता येते. ही लस घेतल्यानंतर पाच ते सात वर्षांनंतर पुन्हा लस घेता येते.
मॉनिंनजोकॉकल – मेंदूशी संबंधित असलेल्या मॅनिनजायटीस आजाराल रोखण्यासाठी ही लस दिली जाते. या आजारामुळे मेंदूला जखमा होतात. रुग्ण दगावण्याचीही भीती असते.