पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारचे कौतुक!

हिवरेबाजारचा हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यातील अन्य १,३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले 

78

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिवरेबाजार गावात कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी कसे यशस्वी प्रयत्न झाले, याची माहिती दिली, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले याचे कौतुक केले.

हिवरेबाजार पॅटर्न १,३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जातोय!

गावात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य  व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. कोरोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुध दुभत्याच्या कामाचे काय होणार ही काळजी मिटली. ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता ते या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच कोरोनामुक्त हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच कोरोनामुक्त झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १,३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले.

प्रधानमंत्र्यांनी जाणून घेतल्या यशोगाथा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समजून घेतली. तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांची प्रयत्नांची आणि अनुभवाची ही शिदोरी पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने यांच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जाव्यात, जिल्ह्याच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत,  अशा सूचनाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी तिसऱ्या लाटेत युवक आणि बालकांना कोरोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात यावी, बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सिजन मास्क तयार ठेवावेत, कोरोनामुक्तीसाठी जनजागृती वाढून कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीचा एकही डोस वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशा काही सुचनाही यावेळी केल्या.

(हेही वाचा : पुण्याच्या तरुणाची काय आहे ‘चांद्र मोहीम’? नक्की वाचा…)

माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची मोलाची मदत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात  राज्यात राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानाची या कामी खूप मदत झाल्याचे सांगून डॉ. भोसले म्हणाले की, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत प्रशासनाला पोहोचता आले, त्यातून सहव्याधी असलेल्या लोकांची माहिती मिळाली. त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करणे शक्य झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवतांना जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कोविड प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचार पद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरू केलेल्या ‘माझा डॉक्टर’ उपक्रमातून राज्यभरातील डॉक्टरांना राज्य टास्कफोर्स च्या तज्ज्ञांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याची माहिती ही डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.

समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती!

जिल्ह्यात प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला. त्यामुळे कामात सुसुत्रता आली. कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांकडून आकारले जाणारे शुल्क या सर्व कामात या समन्वयक अधिकाऱ्यांची मदत झाली. गावपातळीवरील यंत्रणेला या कामात सहभागी करून घेण्यात आले. तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. हे करतांना ‘आपला गाव- आपली जबाबदारी’ ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडण्यात आली. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णांचे गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले. रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये नेऊन उपचार करण्याचे धोरण ठरवल्याने संसर्ग रोखण्यास मदत झाली, असेही ते म्हणाले.

ऑक्सिजन व्यवस्थापन

जिल्ह्यात ऑक्सिजनची उपलब्धता, वितरण करण्यासाठी समन्वयक टीम स्थापन करण्यात आली. या टीमने संपूर्ण जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन केल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनसाठी पॅनिक स्थिती निर्माण झाली नाही. १४ ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट विकसित करण्यात येत असून यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त १,७५० ऑक्सिजन बेडची निर्मिती होऊ शकेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, गर्दी होणार नाही, शारीरिक अंतराचे पालन होईल, मास्क व्यवस्थित वापरला जाईल, हातांची स्वच्छता राहील यादृष्टीने आवश्यक उपाययोजना व जनजागृती केल्याची माहिती ही त्यांनी दिली. या सर्व उपाययोजनांमुळे जिल्ह्याचा पॉझेटिव्हिटी रेट कमी होण्यास मदत झाल्याचे ही ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य सचिवांकडून मुंबईचे कौतुक!

बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशभरातील कोविडची स्थिती, उपाययोजना याचे सविस्तर सादरीकरण केले. यात त्यांनी उत्तम ऑक्सिजन व्यवस्थापन आणि कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला ते म्हणाले की, ऑक्सिजनचा बफर स्टॉक करतांना अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक यांची माहिती जाहीर करून ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.