Eknath Shinde : कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

115

राज्यातील जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य सरकारचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे मंगळवारी येथे सांगितले.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण तसेच सुशोभिकरणाच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर संबंधित बारा रेल्वे स्थानकांवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण यांसह मूलभूत सोयीसुविधा जनसामान्यांना सुलभतेने उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाच्या, राज्याच्या गतिमान विकासात रस्त्यांची व्यापक सुविधा ही महत्त्वाची बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आठशे रेल्वे स्थानकांच्या कायापालटाच्या उपक्रमाची अलीकडेच सुरुवात केली आहे. राज्यातील ४४ स्थानकांचा त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि सुशोभिकरणाचे काम सुरु होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे कोकणाच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल. पर्यटकांना, स्थानिक रहिवाशांना या माध्यमातून चागंल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. त्याचसोबत कोकणातील पर्यटनवृद्धीलाही यामुळे मोठी चालना मिळेल. पर्यटन व्यवसायाला पूरक निर्सगसौंदर्याने संपन्न कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास ही काळाची गरज असून, सरकारने कोकण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा Veer Savarkar : आद्य हिंदी राष्ट्रध्वज इंग्लंडमध्ये फडकावलेल्या घटनेला झाली ११५ वर्षे; सावरकर स्मारकात जागवल्या स्मृती)

रोजगार संधी विस्तारण्यासाठी रेल्वे स्थानकांचे रस्ते महत्त्वपूर्ण : फडणवीस

कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर ठिकाण असून स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी कोकणातील बारा रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटकरण आणि सुशोभीकरणाचे काम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. कोकणाला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभली असून त्या ठिकाणच्या या साधनसंपत्तीचा, सागरी किनारे यांचा योग्य वापर झाला पाहिजे. कोकण रेल्वे ही कोकण विकासाची जीवनवाहिनी असून तेथील रेल्वे स्थानकांचा कायापालट झाला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

तर कोकण रेल्वे स्थानकांच्या रस्ते सुशोभिकरण कामासाठी लागणारा १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.या कामात उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच कोकण रेल्व व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केल्याने हा उपक्रम कमी कालावधीत सुरु करता येत आहे. संबंधित रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण कामाची सुरवात हा कोकण पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा आहे. कोकणातील जिल्ह्यांना याचा निश्चितच व्यापक लाभ मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
सुविधायुक्त स्थानकांची निर्मिती

कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मडुरे रेल्वे स्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. यापैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे आणि सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील वीर, माणगाव आणि कोलाड; रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या चार रेल्वे कामांना राज्य सरकार मार्फत मंजूरी प्रदान केली आहे.

रेल्वे स्थानक सुशोभीकरण अंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, पथदिवे, पेव्हड शोल्डर आणि आर.सी.सी. गटर्स बांधणे, महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात दुकाने उभारणे, अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची व्यवस्था करणे, ऊन पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी छत तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगमन निर्गमनाद्वारे सायकल दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.