रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक अस्फाल्टचा सध्या वापर केला जात आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवल्यानंतर बऱ्याच ठिकाणी उंचवटा तयार झालेला असून असा उंचवटा आढळून आल्यास त्याठिकाणी मिलींग करून त्याचे समतलीकरण करावे, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. तसेच खड्डा बुजवल्यानंतर निर्माण झालेला उंचवटा समतलीकरणासाठी विभागीय सहायक आयुक्त यांनी मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधावा व वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही पी. वेलरासू यांनी विशेषत्वाने केली आहे.
मुंबईत १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत श्री गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरित्या व वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याच धर्तीवर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रस्ते सुस्थितीत राखण्याच्या दृष्टीने सर्व विभाग कार्यालयांसह रस्ते विभागाला लेखी निर्देश दिले आहेत.
श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असून संबंधित कामांना महानगरपालिका प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. श्री गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन सुरळीत व्हावे, यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावीत, खड्डे बुजवताना रस्त्यांचे समतलीकरण होईल, याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, अशी सूचना पी. वेलरासू यांनी सर्व विभाग कार्यालयांना तसेच मध्यवर्ती यंत्रणांना केली आहे.
पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर करण्याची करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात यावे, असे निर्देश पी. वेलरासू यांनी दिले आहेत.
(हेही वाचा – One Trillion Dollar Economy : २०२८ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यासाठी अजित पवारांचा पुढाकार)
आगमन – विसर्जन मार्गांचा नकाशा तयार करुन विशेष लक्ष –
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे. गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या परवानगीनुसार विभागीय सहायक आयुक्त तथा समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांनी श्री गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाचा नकाशा तयार करून आढावा घ्यावा, तसेच विभागीय सहायक आयुक्त यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय साधून खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, गणेशोत्सवासाठी दिलेल्या परवानगीनुसार मंडप उभारणी केल्याने झालेले खड्डे बुजवावेत. असे रस्ते सुस्थितीत करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांची असेल, असेही या आदेशांमध्ये नमूद केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community