शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे याला प्राधान्य देण्यात येईल – फणसाळकर 

शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी मोडून काढणे, गुन्हेगाराचा शोध घेऊन गुन्ह्याची उकल करणे याला मुंबई पोलिसांकडून प्राधान्य दिले जाईल तसेच शहराची वाहतूक सुरळीत करणे आणि शहर सुरक्षित व शांतता राखणे याला माझे प्राधान्य असेल,” असे नवनियुक्त मुंबईचे पोलीस आयुक्त  विवेक फणसाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याच बरोबर पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रादारांना समाधान वाटेल, असे फणसाळकर यांनी नमूद केले.
१९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, फणसाळकर हे मुंबई शहराचे ७७ वे पोलीस आयुक्त आहेत.  गुरुवारी संध्याकाळी त्यांनी संजय पांडे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  पदभार स्वीकारल्यानंतर फणसाळकर यांनी सहपोलीस आयुक्तांची बैठक घेतली.

वाहतूक समस्या सोडवण्यास प्राधान्य

प्रसारमाध्यमांशी बोलताना फणसाळकर यांनी आपले प्राधान्यक्रम अधोरेखित केले, “मुंबई शहरात येणाऱ्या पोलीस आयुक्तांना कायदा व सुव्यवस्थेची माहिती असते, तसेच दहशतवादी कारवाया रोखणे हे मोठे आव्हान असते. शहराची वाढती लोकसंख्या पाहता, गुन्हेगारीला आळा घालणे आणि शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करणे  हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे  फणसाळकर म्हणाले.  “तसेच वाहतूक ही शहरातील सर्वात मोठी समस्या आहे, शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई वाहतूक विभागाकडून भर दिला जाईल असे फणसाळकर म्हणाले.
मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेबद्दल बोलताना ते म्हणाले, “मुंबई पोलीस दल हे जगातील सर्वोत्तम पोलीस दल मानले जाते. या पोलीस दलातील अधिकारी हे उच्च प्रशिक्षित आहेत. मी आमच्या जवानांसोबत फोर्सची प्रतिमा उच्चस्तरावर नेण्यासाठी काम करेन. पोलीस अंमलदार हे पोलीस दलाचे आधारस्तंभ आहेत. मी त्यांना कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम वातावरण देण्याचा प्रयत्न करेन,” असेही ते म्हणाले.

कायदा मोडणा-यांवर कठोर कारवाई

तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मागील काही महिन्यात मुंबईत राबवलेले उपक्रम पुढेही असेच सुरू राहतील का असा प्रश्न पत्रकारांनी फणसाळकर यांना विचारला असता “नागरिकांच्या भल्यासाठी घेतलेला प्रत्येक उपक्रम सुरूच ठेवला जाईल, जर पोलिसांवर त्याचा ताण पडत असेल तर पुढे त्याबाबत विचार केला जाईल. तसेच  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असेल, कायदा मोडणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे फणसाळकर यांनी अधोरेखित केले.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या संरक्षणाला महत्त्व दिले जाईल. पोलिस ठाण्यांना भेट देऊन नागरिकांना समाधान होईल असा प्रयत्न मुंबई पोलिसांचा असेल असेही ते म्हणाले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर एप्रिल २०२५ मध्ये निवृत्त होणार असल्यामुळे त्यांच्याकडे मोठा कालावधी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here