एक काळ होता, कारागृह म्हटले कि नरकयातना समजले जायचे, परंतु आता कारागृहात दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा पाहता कारागृह कैद्यांसाठी नरकयातना न बनता उत्तम निवारा व्यवस्था बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, त्याला पुष्टी स्वतः राज्याचे अतिरिक्त महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीवरून मिळाली. त्यांच्या माहितीनुसार आता कैद्यांना कारागृहातील उपहारगृहात चिकन, मटण, श्रीखंडासह, मिठाई, सुकामेव्यासह बरेच काही मिळणार आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, कारागृहातील कैद्यांसाठीच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या मूलभूत गरजेच्या वस्तूंसोबतच इतर अनेक वस्तूंची वाढ करण्यात आली आहे. अशा एकूण ३० गोष्टी या कँटीनमध्ये मिळणार असून त्याची यादीच महासंचालकांनी जाहीर केली.
(हेही वाचा : भाजप बहुजनविरोधी पक्ष! नाना पटोलेंची टीका)
कैद्यांना कारागृहात कोणते पदार्थ मिळणार?
फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, सीझनल फ्रुट्स, दही, पनीर, लस्सी, सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ, कचोरी, चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी, श्रीखंड, आम्रखंड, शेव, पापडी, लोणचे, सामोसा, च्यवनप्राश, म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे, चहा, कॉफी, फेस वॉश, टर्मरिक क्रीम, एनर्जी बार, ग्लुकॉन डी, अंघोळीचे साबण, अगरबत्ती, बूट पोलिश, ग्रीटिंग कार्ड, मिक्स व्हेज, अंडा करी, वडा पाव, कॉर्नफ्लेक्स, बोर्नव्हिटा, चॉकलेट, उकडलेली अंडी, पनीर मसाला, पुरणपोळी, आवळा, कॅण्डी, मुरांबा, गुलाबजामून, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ, गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी, डिंक लाडू, बेसन लाडू, आले पाक, बटाटा भजी.
कैद्यांना मिळते वेतन, घरचेही पाठवतात मनी ऑर्डर!
शिक्षा भिगणऱ्या कैद्यांना कारागृहात विविध अंग मेहनतीची कामे असतात. त्याबदल्यात त्यांना वेतन दिले जाते. काही कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठवले जातात. तुरुंगाच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी कैदी ही रक्कम वापरू शकतात.
आर्थर रोड जेल बहुमजली होणार!
दरम्यान, यासोबतच अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद यांनी मुंबईतील आर्थर रोड तुरुंग बहुमजली करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवल्याची देखील माहिती दिली. यामुळे तुरुंगाची कैदी ठेवण्याची क्षमता ५ हजारपर्यंत वाढणार आहे.
येरवडा परिसरातच आणखी एक कारागृह
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे जोपर्यंत लागू आहे तोवर बाहेर सोडण्यात आलेल्या कैद्यांना बोलावले जाणार नाही. एकूण 4 हजार 342 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 4 हजार 157 कैदी बरे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर येरवडा परिसरात 5 हजार क्षमतेचे दुसरे कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचेही रामानंद म्हणाले. नवीन कारागृह बांधकामासाठी खाजगी बिल्डर्ससोबतही करार केला जाणार आहे. मात्र, याबाबतचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.