मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये खासगी भूलतज्ज्ञांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मोबदल्याची रक्कम कमी असल्याने, ती वाढवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे प्रत्येक तासासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत आता छोट्या शस्त्रक्रियेसाठी ४५० ते १००० रुपयांची वाढ केली जात आहे. तर मोठ्या शस्त्रक्रियेसाठी १५०० ते २००० रुपयांची वाढ दिली जाणार आहे.
नियोजित वेळेपेक्षा जास्त झालेल्या वेळेसाठी प्रत्येक अतिरिक्त तासांकरताही २०० ते ४०० रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, समितीच्या मान्यतेनंतर एप्रिलपासून याचा लाभ खासगी भूलतज्ज्ञांना दिला जाणार आहे. त्यामुळे आता उपनगरीय रुग्णालयातील भूलतज्ज्ञांना एम विटामिनचा डोस देण्यात येणार असल्याने भविष्यात छोट्या व मोठ्या शस्त्रक्रियांना वेग येणार आहे.
(हेही वाचाः सीबीएसई, आयसीएसई नंतर आता महापालिकेची केंब्रिज मंडळाचीही शाळा)
म्हणून मोबदल्यात होणार वाढ
महापालिकेची एकूण १६ उपनगरीय रुग्णालये असून या सर्व उपनगरीय रुग्णालयांतील विविध शस्त्रक्रिया शास्त्र विभागातील डॉक्टरांतर्फे पार पाडल्या जातात. या शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलतज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्यामुळे रुग्णालयात खासगी भूलतज्ज्ञांकडून सेवा पुरवली जाते. या सर्वांना २०१८ नंतर मंजूर करण्यात आल्याप्रमाणे आर्थिक मोबदला दिला जातो. परंतु हा मोबदला कमी असल्याने भूलतज्ज्ञ महापालिकेच्या या रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास तयार नसतात. त्यामुळे आता त्यांच्या सेवा घेण्यासाठी आर्थिक मोबदला वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी होणार वाढ
नित्य स्वरुपाच्या शस्त्रक्रिया
लहान शस्त्रक्रिया : पहिल्या तासासाठी १४०० रुपयांवरुन १८५० रुपये प्रस्तावित
नियोजित वेळेपेक्षा जास्त झालेल्या प्रत्येक तासासाठी: २०० रुपयांवरून ३०० रुपये प्रस्तावित
मोठ्या शस्त्रक्रिया : पहिल्या तासासाठी ३००० रुपयांवरून ४५०० रुपये प्रस्तावित
नियोजित वेळेपेक्षा जास्त झालेल्या प्रत्येक तासासाठी ५०० रुपयांवरून ७०० रुपये प्रस्तावित
तत्काळ स्वरुपाच्या शस्त्रक्रिया
लहान शस्त्रक्रिया : पहिल्या तासासाठी २५०० रुपयांवरून ३५०० रुपये प्रस्तावित
नियोजित वेळेपेक्षा जास्त झालेल्या प्रत्येक तासासाठीः ४०० रुपयांवरून ५५० रुपये प्रस्तावित
मोठ्या शस्त्रक्रिया : पहिल्या तासासाठी ४००० रुपयांवरून ६००० रुपये प्रस्तावित
नियोजित वेळेपेक्षा जास्त झालेल्या प्रत्येक तासासाठी १००० रुपयांवरून १४०० रुपये प्रस्तावित
Join Our WhatsApp Community