खासगी बसवाले कापतत चाकरमान्यांचो खिसो

कोकणवासीयांच्या भावनिक अडचणींचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या चाकरमान्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूटमार करत आहेत.

143

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असताना, आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जाता आले नव्हते. मात्र, यावर्षी गावात जाणा-या या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे उद्योग सुरू आहेत. कोकण रेल्वे आधीच फुल्ल झाल्याचा फायदा आता खासगी ट्रॅव्हलवाले घेत असून, 1400 ते 2000 तिकीट दर लावण्यात आला आहे.

परिवहन विभागाकडे मागणी

खासगी ट्रॅव्हलच्या दरांबाबत कुठेच एकवाक्यता नाही. त्यामुळे परिवहन विभागाशी संगनमत करुन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची करत असलेली ही लूटमार थांबवावी, अशी मागणी वसई भाजप अल्पसंख्यांक उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे. एसटीचा हा गोंधळी कारभार आणि अन्य कुठलीही वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे, एसटीने जाणे कोकणवासीयांना शक्य होत नाही, त्याचवेळी रेल्वेनेही जाणे शक्य होत नाही. अशावेळी कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसने कोकणात ये-जा करण्याचा मार्ग निवडतात.

(हेही वाचाः डिझेलसाठी पैसे नाहीत म्हणून एसटीने घेतला मोठा निर्णय)

ट्रॅव्हल कंपन्यांची मुजोरी

मात्र, कोकणवासीयांच्या भावनिक अडचणींचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या चाकरमान्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूटमार करत आहेत. पुढील महिन्यात गणेशोत्सव असल्याने चाकरमान्यांनी आतापासूनच आगाऊ बुकिंग करुन ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र वाढलेले डिझेल दर, कोरोनामुळे झालेले नुकसान आणि पोलिस व आरटीओला द्यावे लागणारे हप्ते ही कारणे देत ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आतापासूनच हा दर १४०० रुपयांवर नेऊन ठेवला आहे.

एसटीच्या 1570 बसेसचे बुकिंग

गणपतीच्या निमित्ताने आपल्या गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 11 ऑगस्टपर्यंत तब्बल 1570 बसेसचे बुकिंग झाले असून, अजूनही बसेसची संख्या वाढण्याची शक्यता एसटी महामंडळ प्रशासनाने व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या तिन्ही विभागातून कोकणात गौरी-गणपती उत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या एसटीच्या बसेसचे बुकिंग सुरू असून, 11 ऑगस्टपर्यंत 485 बसेसचे गृप बुकिंग करण्यात आले आहे. तर 550 बसेसचे पूर्ण बुकिंग झाले आहे. 535 बसेस अंशतः बुकिंगसाठी उपलब्ध असून, एकूण 1570 बसेस गौरी -गणपती उत्सवासाठी सज्ज झाल्या असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

(हेही वाचाः एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.