मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य कार्य असलेल्या अग्नी विमोचनाच्या कार्यात अग्निशमन दल प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग स्थरावर जलद प्रतिसाद अग्निशमन वाहने कंत्राटी अग्निशमन कर्मचारी वर्गासह मुंबई अग्निशमन दल यांच्या नावांचा शिक्का (लेबल) लावून खाजगी सेवा सुरु करण्याचा घाट घातला आहे. अग्निशमन दलात १४०० ते १५०० पदे रिक्त असून ही पदे न भरता याचाच आधार घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग स्थरावर मुंबई अग्निशमन दल सेवा व्यतिरिक्त खाजगी पद्धतीने अग्नी विमोचन सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासक स्थायी समितीने १३ जुलै २०२२ रोजी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मंजुरीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास संघटनेच्यावतीने न्यायालयात धाव घेऊन याविरोधातील आंदोलन तीव्र केले जाईल,असाही इशारा संघटनेने दिला आहे.
तर मदत कार्य जीव घेणे ठरणार
मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना दिलेल्या निवेदनात, खाजगी सेवेतील वाहनांवरील अग्निशमन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कार्य (एसओपी) सीमित केल्याने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आणीबाणी प्रसंगी अचानक आपली जबाबदारी झटकल्यास किंवा त्यांच्या कामचुकारपणेमुळे जनतेच्या जीवितांवर बेतल्यास तसेच मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्यास त्याचे थेट परिणाम अग्निशमन दलाच्या कार्यप्रणालीवर होणार आहेत. तसेच यांच्या हस्तक्षेपामुळे मुंबई अग्निशमन दलाचे नियमितपणे व कार्यकुशलतेने सेवा देणाऱ्या आपल्या मुळ अग्निशमन कर्मचारी आणि अधिकारी जवानांचे खच्चीकरणच होवून यांचे मदत कार्य जीव घेणे ठरणार असल्याची भीती वर्तवली आहे.
(हेही वाचा आधी गणेशोत्सवाची व्यवस्था महत्वाची, मग दसरा मेळावा परवानगीवर विचार)
मुंबई अग्निशमन दलाची प्रतिष्ठा, दर्जा जगभरात चांगली
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दल हे एक अत्यावश्यक अग्निशमन सेवा देणारे शिस्तबद्ध व गणवेशधारी दल आहे. मुंबई शहरामध्ये असलेले निवासी, व्यापारी, कार्यालयीन अनेक उत्तुंग इमारती आणि अशाच प्रकारची इमारतींची शहरभर असलेले संकुले, औद्योगिक आस्थापने, रासायनिक व तेल शुद्धीकरण प्रकल्प, विमानतळे, जमिनी अंतर्गत शहरभर केलेले नैसर्गिक वायु आणि अति ज्वालाग्रही तेल वाहिन्या, जुन्या इमारतींचा धोका वाढती झोपडपट्टी आणि लोकसंख्या, बंदर विभागातील गोदामे, अतिरेक्यांचे धोके यामुळे मुंबई अग्निशमन दलाच्या प्रशिक्षित अग्निशमन जवानांकडून अभिप्रेत असलेले जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जीवाची बाजी लावून प्रसंगी आत्म समर्पण करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले जात आहे. यामुळेच आजही मुंबई अग्निशमन दलाची प्रतिष्ठा व दर्जा जगभरात वाखाणली जात असल्याची आठवण त्यांनी दिली आहे.
१४०० ते १५०० अग्निशामक कमी
अग्निशमन प्रशासनाने गेली सहा-सात वर्षे अग्निशामक पदाची भरती केलेली नाही व ते करण्यासाठी आतापर्यंत इच्छुकही दिसली नाही. सद्यस्थितीला अग्निशमन दलात १४०० ते १५०० अग्निशामक कमी आहेत. या सर्वाच्या कामाचा अतिरिक्त बोजा उर्वरित अग्निशामक गेली अनेक वर्षे झेलत आहेत. अग्रिशमन दलात अग्निशामक सेवेसाठी कमी असलेल्याची अपेक्षित परिस्थिती अग्निशमन प्रशासनाकडून हेतुपूर्वक सर्वप्रथम निर्माण करायची व याची योग्य संधी साधून अग्निशमन सेवेवर होणाऱ्या गंभिर परिणामाचे प्रसंग वरिष्ठ पातळीवर रेखाटून कंत्राटी घुसखोरीसाठी पोषक वातावरण निर्माण करायचे, त्यानंतर आवश्यक असलेले प्रस्ताव, कागदोपत्री पूर्तता इत्यादी मंजुरी परस्पर संघटनेचा प्रखर विरोध असतानाही घ्यायचे असे प्रकार गेली अनेक वर्षे अग्निशमन दलाचे जवान प्रत्यक्षपणे अनुभवत असल्याचाही आरोप या संघटनेने केला आहे.
Join Our WhatsApp Community