आश्रम वेबसिरीजचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांच्याविरुद्ध वकील खुश खंडेलवाल यांनी दाखल केलेली याचिका जोधपूर मेट्रोच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्वीकारली. हिन्दू टास्क फोर्सचे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी जोधपुर मेट्रोचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी 17.11.2020 या दिवशी दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी दिलेला आदेश रद्द करून वकील खुश खंडेलवाल यांची याचिका स्वीकारली आहे. न्यायालयाने निर्माता प्रकाश झा आणि बॉबी देओल यांच्या विरोधात प्रथम दर्शनी अहवाल नोंदवून घेण्याच्या विनंतीवर पुनर्विचार करण्याचा आदेश दिला आहे.
निर्माते प्रकाश झा यांच्या आश्रम नावाच्या वेबसिरीजमध्ये बॉबी देओल हिंदू धार्मिक नेत्याच्या भूमिकेत आहेत. या वेबसीरिजमध्ये हिंदू धर्मगुरूंना बलात्कारी, भ्रष्ट, अमली पदार्थ तस्कर म्हणून दाखवण्यात आले आहे. यासोबतच या वेबसिरीजच्या माध्यमातून दलित आणि उच्चवर्णीय समाजात तीव्र द्वेष पसरवण्यात येत आहे. यावर खंडेलवाल यांनी 22.08.2020 रोजी प्रकाश झा आणि बॉबी देओल यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 153 ए आणि 295 ए अंतर्गत प्रथम दर्शनी अहवाल नोंदवण्यासाठी जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कुडी पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने खंडेलवाल यांनी जोधपूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-याकडे तक्रार दाखल करून या दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची विनंती केली होती. 17.11.2020 रोजी न्यायदंडाधिका-यानी कोणतेही न्याय्य कारण न देता ती विनंती नाकारली. त्यानंतर खंडेलवाल यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करून न्यायदंडाधिका-याच्या त्या आदेशाला आव्हान दिले. ज्यामध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुरुवातीला प्रकाश झा आणि बॉबी देओल यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडेलवाल यांची याचिका मान्य करत खंडेलवाल यांच्या या दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याच्या मागणीवर फेरविचार करण्याचे निर्देश न्यायदंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community