मुंबई महानगरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल येथील वाया गेलेले अन्न आणि मोठ्या भाजी मंडईतील वाया गेलेला भाजीपाला संकलित करण्यात येणार असून या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी दररोज लागणारा जैविक कचरा महानगरपालिकेकडून खास वाहनातून पुरविला जाणार आहे. बायोगॅस प्रकल्प प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल आणि या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू मुंबईत वापरला जाणार आहे.
मुंबईतील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, महानगरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. याप्रसंगी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह कचऱ्यापासून तयार होणारा हा बायोगॅस मुंबईला प्रदूषणापासून मुक्त ठेवणार, असा आशावाद राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच महानगरपालिका आणि महानगर गॅसने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे लवकरच मुंबईतील हजारो टन कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे. यासोबत मुंबईकरांना पर्यावरणपूरक बायोगॅसही वापरासाठी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, महानगर गॅसचे अध्यक्ष महेश अय्यर, व्यवस्थापक आशू सिंघल, महानगरपालिकेच्या उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव आदी उपस्थित होते. या समारंभात, महानगरपालिकेकडून उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव आणि ‘महानगर गॅस’कडून उपाध्यक्ष मानस दास यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी दररोज एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस तयार होणार आहे.
(हेही वाचा BMC : मुंबईतील प्रत्येक भागांमधील पावसाची नोंद होणार अचूक; कारण महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल)
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री केसरकर म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना मुंबईकरांनीही जोड द्यायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे,असे आवाहन केले आहे. तर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र शासनही राज्यात सौर ऊर्जा, हरित ऊर्जा यावर जोर देत आहे. या शृंखलेतील हा बायोगॅसचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आपण भविष्यातील आधुनिक मुंबई पाहणार आहोत. कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे, तसेच प्रदूषण कमी होवून नागरी आयुर्मान देखील सुधारणार आहे. त्यामुळे मुंबईची नव्या दिशेने वाटचाल होईल, असे त्यांनी नमूद केले.
कचरा प्रक्रियेसाठी आणखी एक भूखंड
मुंबईत सन २०५० पर्यंत कार्बन न्यूट्रलसाठीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट इतर शहरांच्या तुलनेत वीस वर्ष आधीचे ठेवण्यात आले आहे, असेही महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सांगितले. तसेच मुंबईत तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी आगामी कालावधीत आणखी भूखंड उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.
शहरासाठी एक शाश्वत पर्याय उपलब्ध
राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीमुळे सार्वजनिक, खासगी भागीदारीतून शहरासाठी एक शाश्वत पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्राचाही वेळोवेळी पाठिंबा लाभलेला असून यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका प्रयत्न करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community