तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागांवर नोकरीचे आमिष दाखवून मुखेड (Mukhed) तालुक्यातील १६ जणांना १ कोटी १४ लाख रुपयांनी गंडविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात कामगार आयुक्तालयातील क्लास वन अधिकाऱ्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोविंदराव गिरी यांनी या प्रकरणात मुखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. (Talathi Fraud)
(हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळात भाजपा वरिष्ठांचा एकनाथ शिंदे यांच्यापुढे पर्याय, तर अजित पवारांना झुकते माप)
तलाठी पदाची परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीमार्फत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानुसार गिरी यांनी जावेद तांबोळी याला दहा लाख रुपये दिले. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये बोलावून आणखी दहा लाख गिरी यांच्याकडून घेतले. गिरी हे केंद्रप्रमुख असून, त्यांच्या दोन्ही मुलांना तलाठी पदावर नोकरी लावण्याचे आमिष पाहुणे असलेल्या रामदास गोपीनाथ शिंदे यांनी दाखविले होते. त्यांनी कामगार आयुक्त कार्यालयात असलेले क्लास वन अधिकारी पवनकुमार चव्हाण, कल्पेश रविकांत जाधव यांच्याशी ओळख करून देत अनेकांना नोकरी लावल्याचे गिरी यांना सांगितले.
असा झाला भांडाफोड
गिरी यांना ११ सप्टेंबर रोजी आणखी दहा लाख रुपये घेऊन वाशी येथे बोलावण्यात आले होते. वाशीतील मार्केट यार्डात ते पैसे घेऊन थांबल्यानंतर त्या ठिकाणी जावेद तांबोळी, रामदास शिंदे व कल्पेश जाधव हे आले. त्या तिघांनी गिरी आणि त्यांच्या मुलाला विश्वा लॉजमध्ये नेले. या ठिकाणी आरोपींना दहा लाख रुपये देत असताना गिरी यांच्या मुलाने लपून मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते. जानेवारी २०२४ मध्ये तलाठी पदाच्या परीक्षेचा निकाल लागला, मात्र त्यात यातील एकाचेही नाव नव्हते. त्यामुळे गिरी यांनी चव्हाण यांच्यासह सर्वांना फोनवरून विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गिरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अशा प्रकारे सोळा उमेदवारांकडून सात जणांनी १ कोटी १४ लाख रुपये उकळले. (Talathi Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community