भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं फिट तो इंडिया फिट’ या घोषणेसह ‘फिट इंडिया’ या अभियानाची सुरुवात केली. याच अभियानातून प्रेरणा घेऊन मुंबई महानगरपालिकेने ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येत आहे. आपल्या मुंबईला सुदृढतेची म्हणजेच फिटनेसची राजधानी करण्याच्या दृष्टीने ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’ हे एक महत्त्वाचे आणखी एक पाऊल असल्याचा विश्वास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी व्यक्त केला. याच मॅरेथॉनच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून येत्या २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘प्रोमो-रन’चे आयोजन करण्यात येत असून या अनुषंगाने सोमवारी एका नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.
( हेही वाचा : व्हीप न पाळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार – भरत गोगावले )
आयोजित बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी व अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) निसार तांबोळी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, पोलिस उप आयुक्त (वाहतूक) गौरव सिंग, पोलिस आयुक्त (परिमंडळ १) हरि बालाजी, भारतीय स्टेट बँकेचे उप महाप्रबंधक विमलेन्दु विकास, अर्ध मॅरेथॉनचे समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, माहिती तंत्रज्ञान खात्याचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख शशी बाला, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि मॅरेथॉन प्रोमो-रनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आजच्या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेद्वारे आयोजित करण्यात येणारी अर्ध मॅरेथॉन ही भविष्यात एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक असलेली मॅरेथॉन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गावरील वाहतूक सुरु झाल्यानंतर त्या मार्गावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी बैठकीदरम्यान नमूद केले. मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित करण्यात येणारी अर्ध मॅरेथॉन ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची एक वेगळी ओळख ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान या बैठकीच्या सुरुवातीला ‘फिट मुंबई बीएमसी एसबीआय हाफ मॅरेथॉन’ चे समन्वयक तथा सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी येत्या रविवारी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी होणा-या ‘प्रोमो-रन’ च्या नियोजनबाबत व करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणासह सविस्तर माहिती दिली. या अनुषंगाने करण्यात येणा-या वाहतूक व्यवस्था नियोजनाची माहिती उपस्थितांना मुंबई पोलिस दलाच्या प्रतिनिधींद्वारे देण्यात आली. त्याचबरोबर मॅरेथॉन ‘प्रोमो-रन’च्या अनुषंगाने करण्यात येणारी वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, साफसफाई याबाबत देखील उपस्थितांना माहिती देण्यात आली.
येत्या रविवारी होणा-या ‘प्रोमो-रन’मध्ये ५ हजार नागरिक भाग घेणार असून याबाबतची नोंदणी प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. या ‘प्रोमो-रन’चे आयोजन हे ३ किलो मीटर, ५ किलो मीटर व १० किलो मीटर अशा ३ प्रकारात करण्यात येणार असून याचा शुभारंभ सकाळी ६.०० वा. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ होणार आहे. याच ‘प्रोमो-रन’च्या अनुभवांचा आधार घेऊन ‘अर्ध मॅरेथॉन’चे आयोजन भविष्यात करण्यात येणार आहे, अशीही माहिती या बैठकीदरम्यान देण्यात आली.
उद्दिष्ट काय?
- फिट मुंबई अर्ध मॅरेथॉन उपक्रमाची व फिट इंडिया चळवळीची ओळख मुंबईकरांना करुन देणे.
- सद्यःस्थितीत प्रभाग स्तरावर विविध उपक्रमांमार्फत मुंबईकरांना योग, ध्यान, प्राणायाम आदींचे धडे देवून शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी प्रशिक्षित केले जात आहे.
‘प्रोमो-रन’ची मार्गिका
येत्या दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता महानगरपालिका मुख्यालयापासून हुतात्मा स्मारक चौक, चर्चगेट रेल्वे स्थानक, एनसीपीए, मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गावर ३ किलो मीटर, ५ किलो मीटर आणि १० किलो मीटर अशा ३ प्रकारात ही मॅरेथॉन होणार आहे. ‘प्रोमो-रन’ स्वरुपात होत असलेल्या या मॅरेथॉनची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये सुमारे ३ हजार महानगरपालिका अधिकारी तथा कर्मचारी आणि ३ हजार नागरिक सहभागी होणार आहेत.
Join Our WhatsApp Community