राज्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बढत्या रखडल्या, अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

promotion of senior police inspector in the state has been stopped
राज्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बढत्या रखडल्या, अधिकाऱ्यामध्ये नाराजी
राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या बढत्या मागील सहा महिन्यांपासून रखडल्या आहेत. बढत्यापूर्वी अनेक अधिकारी सेवानिवृत्त होत असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून १७९ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बढत्याची फाईल गृहविभागाकडे पाठविण्यात आली आहे, त्याच्यावर गृहमंत्री यांच्या स्वाक्षऱ्या झालेल्या नसल्यामुळे या बढत्या रखडल्या असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे.
राज्य पोलीस दलातील सुमारे १८० वरिष्ठ पोलीस निरीक्षक गेल्या ६ महिन्यापासून सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बढतीच्या प्रतीक्षेत आहे. यापैकी अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक बढतीविनाच निवृत्त झाले आहे. प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची इच्छा असते की, निवृत्तीपूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त पदाची बढती मिळावी. मात्र मागील सहा महिने उलटून देखील अद्याप बढती न झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. गेल्या महिन्यात काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले असून येत्या महिन्याभरामध्ये आणखी काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त्तीच्या वाटेवर असून बढती मिळते का बढतीविनाच निवृत्ती स्वीकारावी लागणार आहे असा प्रश्न बढतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अधिकारी यांना पडला आहे.
राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यभरातील १७९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बढतीची यादी तयार करण्यात आलेली आहे, ही यादी स्वाक्षरीसाठी राज्याचे गृहमंत्री यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे, मागील काही महिन्यापासून ही यादी गृहमंत्री कार्यालयात धूळ खात पडलेली आहे, बढतीच्या फाईलवर अद्याप राज्याचे गृहमंत्री यांची स्वाक्षरी झालेली नसल्यामुळे ती यादी अद्याप महासंचालक कार्यालयाकडे पाठवली गेलेली नसल्याचे वरिष्ठ अधिकारी दर्जाच्या अधिकारी यांचे म्हणणे आहे. तसेच लवकरच बढतीचे आदेश निघेल अशी शाश्वती या अधिकारी यांनी बोलून दाखवली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here