मालमत्ता कर वसुल करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता मोठ्या थकबाकीदारांना लक्ष केले आहे. कोट्यावधी रुपयांचा कर थकवणा-या तब्बल 200 हून अधिक थकबाकीदारांवर करनिर्धारण आणि संकलन विभागाने नोटीस बजावली आहे. महिना अखेरीपर्यंत थकीत कर न भरल्यास, आलिशान वाहने, महागड्या वस्तू जप्त करण्याची तसेच कार्यालयाला टाळे ठोकण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे.
…म्हणून झाला करावर परिणाम
चालू आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी सात हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज पालिका आयुक्तांनी 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात व्यक्त केला होता. मात्र कोरोना काळात नागरिकांचे बिघडलेले गणित, भांडवली मूल्यामधील सुधारणांना झालेला विरोध, 500 चौरस फुटापर्यंत घरात राहणा-या रहिवाशांना केलेली करमाफी लक्षात घेऊन मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित उत्पन्न सात हजार कोटी रुपयांवरुन 4 हजार 800 कोटी रुपये असे सुधारित करावे लागले.
( हेही वाचा: झाडं सरकारी, पण जबाबदारी मात्र नागरिकांचीच! )
..तर किमती वस्तू जप्त
मालमत्ता करापोटी तब्बल 2 हजार 294.95 कोटी रुपये थकवणा-या 200 जणांची यादी करनिर्धारण व संकलन विभागाने तयार केली आहे. या यादीत समावेश असणा-या लोकांना दिलेली मुदत फेब्रुवारीच्या अखेरीस संपणार आहे. त्यामुळे नोटिसा मिळूनही कर न भरणा-या थकबाकीदारांची आलिशान वाहने, महागड्या वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. तसेच कार्यालयाचा काही भाग वा संपूर्ण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा विचार सुरु आहे.
Join Our WhatsApp Community