महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील प्रशासकीय कामांमध्ये अधिक गुंतन राहिल्यामुळे वैद्यकीयअ आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष होणाऱ्या अधिष्ठाता (डिन) यांच्या खांद्यावरील भार कमी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये प्रशासकीय कामांसाठी विशेष कार्य अधिकारी (सीईओ) यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून प्रत्येक रुग्णालयांमध्ये सीईओ पदाची निर्मिती करण्यासाठी लवकर हा प्रस्ताव प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठाता यांच्याकडे स्वाक्षरीकरता पाठवली जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच अधिष्ठातांच्या स्वाक्षरीने पदनिर्मिती झाल्यानंतर सीईओंच्या नियुक्तीची पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या केईए, शीव, नायरसह कुपर या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रशासकीय कामांसाठी विशेष कार्य अधिकारी (सीईओ) नेमण्याच निर्णय तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला होता. त्यानुसार डिन यांच्यावरील प्रशासकीय कामांचा भार कमी करून त्या रुग्णालयांमध्ये प्रशासकीय स्वरुपांची कामे करण्यासाठी सहायक आयुक्तांवर सीईओची जबाबदारी सोपवण्यात आली होती. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्याप्रमाणात दाखल होणाऱ्या गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा सुविधा महापालिकेच्यावतीने पुरवली जात असून या सेवा चांगल्याप्रकारे पुरवल्या जाव्यात तसेच डॉक्टरांसह नर्सेससह इतर रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास संपादन करणे हे अधिष्ठात यांचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु रुग्णालयांचे अधिष्ठाता यांच्यावर वैद्यकीय सेवांपेक्षा अधिक रुग्णालय इमारतींचे बांधकाम, साफसफाई, इतर यंत्रांची खरेदी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीची समस्या तसेच विविध कंत्राटे आदी कामांमध्येच अधिष्ठाता अधिक व्यस्थ असतात. यासाठी त्यांना वारंवार महापालिका मुख्यालयात हजेरी लावावे लागते. परिणामी महापालिका रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांचा दर्जा घसरत चालला असून रुग्णांचाही या रुग्णालयांवरील विश्वास उडत चालला आहे.
त्यामुळे महापालिका प्रमुख रुग्णालयांमधील अधिष्ठातांना प्रशासकीय कामांमधून मुक्तता करून चार रुग्णालयांसाठी ४ सीईओंची पदे ही कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून भरली जाणार आहे. कार्यकारी अभियंत्यांमधून परीक्षा घेऊन ही पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सीईओंची पदनिर्मिती केली जात असून ही पदे निर्माण करण्यासाठी चारही रुग्णालयांच्या अधिष्ठातांना प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळत आहे. या पदनिर्मितीसाठी सर्व अधिष्ठातांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा असून या सर्वांच्या स्वाक्षरी झाल्यानंतर पदनिर्मितीची पुढील प्रक्रिया राबवली जाईल,अशी माहिती मिळत आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे असून तिथून हा प्रस्ताव पदनिर्मितीला मान्यता घेण्यासाठी अधिष्ठाता यांच्याकडे पाठवला जाईल,अशी माहिती मिळत आहे.