सांताक्रुझ आणि घाटकोपर मेट्रोदरम्यान झाडे कापण्याचा प्रस्ताव शासनाकडे

अशाप्रकारे प्रथमच शासनाकडे झाडे कापण्यास परवानगी मागवण्यासाठीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

138

मेट्रो रेल्वेच्या लाईन-२ बी आणि मेट्रो लाईन-४च्या बांधकामामध्ये बाधित होणारी झाडे कापण्यासाठीचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने शासनाकडे पाठवले आहेत. त्यामुळे या दोन्ही कामांमध्ये १८५ झाडे कापणे आणि ४०० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार २०० पेक्षा अधिक असलेली झाडे कापण्याचा व पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावावर शासन निर्णय घेईल, तो अधिकार वृक्ष प्राधिकरणाला नाही.

त्यानुसार वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष इक्बालसिंह चहल यांनी हे दोन्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवले असून, रेल्वे मार्गाच्या आड येणारी झाडे कापण्याचे तीन प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचाः कुलाबा-सीप्झ मेट्रोची आरेतील ‘त्या’ जागेवर एन्ट्री होणार नाहीच! )

प्रस्ताव प्रथमच शासनाकडे

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत प्रथमच झाडे कापण्याच्या परवानगीसाठी आलेले दोन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सांताक्रुझ पूर्व बीकेसी येथील मेट्रो लाईन-२ बी अंतर्गत कलानगर ते बीकेसी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या नियोजित बांधकामात येणाऱ्या एकूण ५४८ झाडांपैकी ५२ झाडे कापण्यास आणि २९२ झाडे पुनर्रोपित करण्याचा समावेश होता. तर दुसरा प्रस्ताव हा घाटकोपर पूर्व येथील ९० फूट रोड ते घाटकोपर पश्चिम सूर्या नगर लालबहादूर शास्त्री मार्ग पर्यंतच्या मेट्रो लाईन-४च्या कामात येणाऱ्या एकूण ८६८ झाडांपैकी १३३ झाडे कापण्याचा आणि १०८ झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव होता. हे दोन्ही प्रस्ताव प्राधिकरणाचे अध्यक्ष इक्बालसिंह चहल यांनी शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार शासनाकडे परत पाठवले आहेत. अशाप्रकारे प्रथमच शासनाकडे झाडे कापण्यास परवानगी मागवण्यासाठीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

ही झाडे कापण्यास परवानगी

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत एकूण दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर तीन प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आले आहेत. या दहा मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये एकूण १ हजार ९४० झाडांपैकी ५९९ झाडे कापण्यास आणि ४२६ झाडे पुनर्रोपित करण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये मंत्रालय परिसरातील मेट्रो स्टेशन भुयारी मार्गाच्या बांधकामात आड येणाऱ्या ६३ झाडांपैकी २४ झाडे कापण्यास आणि १७ पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय विक्रोळी मेट्रोलाईन-४, मुलुंड चेकनाकापर्यंत मेट्रो लाईन-४च्या बांधकामांमध्ये आड येणारी झाडेही कापण्यास परवानगी देण्यात आली आहे.

(हेही वाचाः शिवसेना करणार बेस्टची ‘एसटी’)

यासंदर्भात वृक्ष प्राधिकरण सदस्य आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्राधिकरणापुढे एकूण २२ प्रस्ताव होते. त्यातील दहा प्रस्ताव संमत झाले तर दोन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले असल्याचे सांगितले. जे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत त्यामध्ये ४८५ झाडे कापण्यास आणि १७९ झाडे पुनर्रोपित करण्यास परवानगी देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.