राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी महावारसा सोसायटी स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ही सोसायटी स्थापन झाल्यास शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या गड-किल्ल्यांची होणारी दुर्दशा थांबेल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. वने आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेवरुन मंत्रालयातील समिती कक्षात राज्यस्तरीय गडकिल्ले संवर्धन समितीची बैठक झाली. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून आमदार संजय केळकर बोलत होते.
संरक्षित किल्ल्यांबरोबरच असंरक्षित किल्ल्यांनाही संरक्षित केल्यास तेथील वाढत जाणारी अतिक्रमणे आणि विविध समस्या सोडविणे सोपे होईल. त्यासाठी राज्यातील असंरक्षित किल्ले संरक्षित करून शासनाने ते ताब्यात घ्यावेत, अशी मागणी केळकर यांनी केली.
राज्यात राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली अनेक गडकिल्ले आहेत. राज्यात संरक्षित आणि असंरक्षित गडकिल्लेही आहेत. अशा गड-किल्ल्यांवर सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी महावारसा सोसायटी स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शासनाच्या विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी पदसिद्ध सदस्य म्हणून काम करणार आहेत. विभागीय स्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच धर्तीवर समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे गडकिल्ले संवर्धनाच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वखर्चाने आणि पुढाकाराने मोहीम आखणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेचे कार्याध्यक्ष असलेले आमदार संजय केळकर यांनी याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत सातत्याने अधिवेशनात आणि सरकार दरबारी वाचा फोडली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यस्तरीय गडकिल्ले संवर्धन समिती गठीत केली आहे. या समितीची वर्षातून चार वेळा बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच समिती सदस्यांना पुरातत्व विभागाकडून ओळखपत्रही देण्यात येणार आहेत.
गडकिल्ल्यांच्या परिपूर्ण विकासाकरिता नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात येत असून त्यात जागतिक संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे यांनी बैठकीत दिली. गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवून गडावर गड सेवकांची, किल्लेदाराची तसेच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, किल्ल्यांची माहिती देण्यासाठी गाईड नेमावेत आदी सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या.
समितीच्या माध्यमातून दुर्गसेवकांचा सन्मान करणे, वेळोवेळी प्रोत्साहन देणे, शासनातर्फे पुरस्कार देणे आदींबाबत आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही यावेळी आमदार संजय केळकर यांनी दिली.
बैठकीस आमदार संजय केळकर तसेच आमदार मंगेश चव्हाण, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, प्र.के.घाणेकर सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, उपसचिव श्री. पाष्टे तसेच राज्यभरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(हेही वाचा – गोवर तपासणी प्रयोगशाळांच्या निर्मितीची आरोग्यमंत्र्यांची सूचना, मात्र आरोग्य विभागाकडून केराची टोपली)
Join Our WhatsApp Community