लसींच्या पुरवठ्यासाठी महापालिकेकडे तीन कंपन्यांचे प्रस्ताव! कोणत्या आहेत त्या कंपन्या?

तीन प्रस्ताव महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. परंतु यामध्ये लस उत्पादन करणा-या कंपन्यांपैकी एकही कंपनी नसल्याची माहिती मिळत आहे.

122

कोविड-१९ प्रतिबंध लसींचे १ कोटी डोस पुरवण्यासाठी महापालिकेने जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्तींकडून मागवलेल्या दरपत्रिकांचा कालावधी हा २५ मे २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, तोपर्यंत तीन कंपन्यांकडून महापालिकेला लसी पुरवण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यामध्ये एकही उत्पादन कंपनी नसल्याची माहिती मिळत आहे.

प्रस्ताव न आल्याने मुदतवाढ

कोविड-१९ प्रतिबंधक लसींचे १ कोटी डोस पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती (इओआय) प्रकाशित करुन, वेगवेगळ्या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते. १२ मे २०२१ रोजी ही सूचना प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार १८ मे २०२१ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत महापालिकेकडे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करावयाचे होते. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता हे प्रस्ताव उघडण्यात येणार होते. परंतु शेवटच्या दिवसापर्यंत एकही प्रस्ताव न आल्याने प्रशासनाने याची मुदत २५ मे २०२१ पर्यंत वाढवली.

(हेही वाचाः ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रशासन गंभीर? सहा महिन्यांनी नेमले जातात कंत्राटदार)

त्या तीन कंपन्या कोणत्या?

ही मुदत वाढवल्यानंतर संध्याकाळी तीन प्रस्ताव महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. परंतु यामध्ये लस उत्पादन करणा-या कंपन्यांपैकी एकही कंपनी नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या सिरम, भारत बायोटेक आणि डॉ.रेड्डी या तीन कंपन्या लस निर्मिती करत असून, यापैकी कोणीही पुरवठ्यासाठी प्रस्ताव केला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ज्या तीन कंपन्यांचे प्रस्ताव सादर झालेले आहेत, त्यांचे उत्पादन कंपन्यांशी काय आणि कशाप्रकारे संबंध आहेत, याची पडताळणी करण्यात येणार आहे.

याबाबत मध्यवर्ती खरेदी खात्याचे प्रभारी उपायुक्त संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लसींचे डोस खरेदीसाठीची मुदत एक आठवड्याने वाढवण्यात आल्याचे सांगितले. परंतु दरम्यान दोन ते तीन प्रस्ताव सादर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.