पाकिस्तानला आर्थिक सहाय्य करणाऱ्या अमेरिकेच्या भूमिकेविरोधात मुंबईत निदर्शने

142

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांसाठी ४५ कोटी डॉलरची (३ हजार ६५१ कोटी रुपये) आर्थिक मदत केली होती. बायडन यांच्या या दहशतवाद पुरस्कृत निर्णयाला विरोध करून भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन वस्तूंवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी वीर योद्धा संघटनेने शनिवारी मुंबईच्या आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले.

वीर योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रीकांत रांजनकर यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. अमेरिकेच्या या दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त करीत अमेरिकन वस्तूंच्या भारतातील विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अमेरिकेकडून दहशतवादाला खतपाणी

जगभरातील दहशतवाद आणि पाकिस्तान यांचा थेट संबंध असल्याचे ९/११, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनी सिद्ध झाले आहे. शिवाय एफ-१६ विमानांच्या मदतीने पाकिस्तानने बालाघाट हवाई हल्ला घडवून आणला होता. अशा परिस्थितीत एफ-१६ सारख्या लढाऊ विमानासाठी आर्थिक पाठबळ देऊन अमेरिका थेट दहशतवादाला खतपाणी घालत असल्याची आमची भावना झाली आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका-पाकिस्तानच्या या व्यवहारावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. यावर अमेरिकेचे सहाय्यक संरक्षण मंत्री एली रैटनर म्हणतात की, पाकिस्तानला मदत ही अमेरिकेच्या फायद्यासाठी केली आहे. यात भारताचा काहीही संबंध नाही. एली रैटनर यांचं हे वक्तव्यही निषेधार्ह आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

हा सैनिकांचा अपमान

दोन देशांना आपसात लढवून हीत साधण्याचा पश्चिमात्य देशांचा पूर्व इतिहास राहिलेला आहे. अमेरिका स्वतःचे शस्त्र विकण्यासाठी अशा पद्धतीने व्यवहार करत आहे, हे निंदनीय आहे. अमेरिका आपल्या वस्तू जगभरात विकून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक काय करतो. तशीच कमाई अमेरिका आपल्या वस्तू भारतीय बाजारपेठेत विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग पाकिस्तान सारख्या दहशतवाद पोसणाऱ्या देशाला मदत करण्यासाठी करीत असेल तर भारतासाठी सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या सैनिक आणि देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा एकप्रकारे तो अपमान आहे.

भारताच्या भूमिकेवरील आक्षेप निंदनीय

नुकताच वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कणखर आर्थिक भूमिकेवर जो काही आक्षेप नोंदविला आहे तो सुद्धा निंदनीय आहे. तसेच ही जाहिरात म्हणजे समस्त भारतीयांचा अपमान आहे. या अशा अमेरिकेच्या स्वार्थी भूमिकेला आक्रमकपणे विरोध करीत भारतीय जनतेची भूमिका मांडणे गरजेचे आहे त्यासाठी आज हे तीव्र आंदोलन करत असल्याचे रांजनकर यांनी बोलताना सांगितले. समस्त भारतीयांच्या भावना लक्षात घेता आपण अमेरिकेतील ज्या वस्तू बाजारपेठेत विकल्या जात आहेत त्या सर्व वस्तूंवर बंदी घालावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.