३० नोव्हेंबरपासून राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिका संघटनेने पुकारलेले आंदोलन आता न्यायालयात जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा शिंदे यांच्या बदलीविरोधात परिचारिकांनी आंदोलन पुकारले आहे. परिचारिकांना बेमुदत आंदोलन करता येणार नाही, मनीषा शिंदे यांची बदली नियमानुसारच झाल्याने आंदोलनाचे कारण योग्य नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले. त्याविरोधात परिचारिका संघटनेनेही न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.
नेमके प्रकरण काय
३ ऑगस्ट रोजी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षणार्थीचा अतिरिक्त कारभार सांभाळणा-या मनीषा शिंदे यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांना तक्रार केली. या तक्रारीनंतर अहवाल आपल्या बाजूने लागला तरीही सूडबुद्धीने आपण परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा असल्याने वरिष्ठ पातळीवरुन बदली करण्यात आल्याचा आरोप मनीषा शिंदे यांनी केला आहे. बदलीकरिता तब्बल १०० ज्येष्ठ परिचारिका प्रलंबित असताना आपलीच बदली कशाला, अशा प्रश्नही डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला. बदलीविरोधात आपण न्यायालायीन लढा लढू, याबाबत शिक्षण व संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. म्हैसेकर यांनाही आपण कल्पना दिली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
आंदोलनाची भूमिका चुकीची
बदलीविरोधात राज्यातील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी ३० नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारणे चुकीचे आहे. संपापासून परिचारिकांविरोधात होणा-या कारवाईबाबत सोमवारी भूमिका जाहीर केली जाईल, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
परिचारिकांमध्येही फूट
सरकारी रुग्णालयातील परिचारिकांच्या बेमुदत आंदोलनात अगोदरच फूट पडली आहे. आंदोलन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारले आहे. मात्र महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनन या परिचारिकांच्या जुन्या संघटनेने आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community