अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एसटीसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात सगळा निधी उपलब्ध होईल का, असा सवाल दबक्या आवाजात विचारला जाऊ लागला आहे. कारण, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात एसटीला नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी १ हजार ४२३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २९८ कोटीच वितरित करण्यात आले. त्यामुळे पूर्वानुभव लक्षात घेता नव्या सरकारने केलेल्या घोषणा केवळ कागदावरच राहू नयेत, अशी अपेक्षा एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात गाड्या खरेदी करण्यासह स्थानकांच्या नूतनीकरणासाठी १ हजार ४२३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. सरकारने त्यापैकी केवळ २९८ कोटी रुपये एसटीला दिले. त्यामुळे प्रस्तावित वाहन खरेदी आणि बसस्थानकांचा पुनर्विकासही रखडला. वर्ष २०१५ ते २०२२ या कालावधीत १७९ बस स्थानकांचे आधुनिकीकरण, पुनर्बांधणी, नुतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यापैकी केवळ ४९ बस स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. अशात यंदाच्या अर्थसंकल्पात १०० बसस्थानकांच्या पुनर्बांधणीकरिता ४०० कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा हसन मुश्रीफ यांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर समन्स)
९०० कोटी रुपयांची देणी प्रलंबित
गेल्या काही महिन्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अपुरा निधी दिल्याने भविष्य निर्वाह निधी उपदान, बँक कर्ज, एलआयसी आणि इतर अशी एकूण ९०० कोटी रुपयांची देणी अद्यापही प्रलंबित आहेत. त्याकरिता राज्य सरकाने विशेष तरतूद करणे आवश्यक होते. मात्र तशी कोणतीही घोषणा झाली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Join Our WhatsApp Community