मुंबईमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला ना रेल्वे लोकलचा प्रवास जबाबदार आहे ना गर्दीची ठिकाणे. याला विवाह आणि हळदी समारंभ हेच या कोरोनावाढीला कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. समारंभ आणि हळदी समारंभामध्ये नातेवाईक, आप्तस्वकीय असतात, त्यामुळे त्यांच्याकडून कोविडबाबतच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नाही. परिणामी या निष्काळजीपणामुळेच अधिक रुग्ण वाढत असल्याचे विभागातील रुग्ण तपासातून दिसून येवू लागले आहे.
रेल्वे लोकलच्या प्रवासामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढली नाही!
मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही पुन्हा मुंबईकरांच्या आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पाडणारी आहे. त्यामुळे या वाढत्या रुग्ण संख्येबाबत प्रत्येक विभागातील प्रकरणे पडताळून पाहिली जात आहेत. यामध्ये लग्न सराई आणि त्यातील हळदीचा कार्यक्रम तसेच पब आदी ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे अधिक आढळून आले आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांचा इतिहास तपासला जात असून यामध्ये बहुतांशी विभागांमध्ये हीच कारणे आढळून आली आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजून तरी रेल्वे लोकलच्या प्रवासामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढली, असे कुठलेही कारण पुढे आलेले नाही. जर लोकलमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढली असती तर ती यापूर्वीची वाढली असती, असे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे लोकलमध्ये काही एक ते दोन टक्के लोक सोडले तर सर्वच जण मास्कचा वापर करता तसेच वारंवार हाताला सॅनिटाईजही करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक प्रवासी हा आपल्या सहप्रवाशाकडे संशयित नजरेने पाहत असतो आणि त्यातून तो काळजी घेत असतो. त्यामुळेच लोकलमुळे रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता अल्प आहे.
(हेही वाचा : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी परिणामकारक!)
पबमधूनही होतोय प्रसार!
परंतु त्या तुलनेत लग्न आणि हळदीच्या समारंभात नातेवाईक व आप्तस्वकीय असल्याने काळजी घेण्याचे प्रमाण फार कमी आहे. जेव्हा वेगवेगळ्या विभागांमधून कुटुंबे एकत्र जमा होत असतात, त्यामुळे त्यांनी मास्क लावणे, तसेच अंतर सोवळे अर्थात सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. परंतु लग्न आणि हळदीच्या अशा प्रकारच्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामी अशा समारंभामधून कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याचे बोलले जात आहे. याबरोबरच या आजाराचे दुसरे निर्मिती केंद्र म्हणजे पब आहे. खाण्यापिण्याच्या नादात पबमध्ये मास्क लावण्याचे भान कुणालाही राहत नाही. परिणामी तिथून याचा प्रसार अधिक होत आहे.
Join Our WhatsApp Community