मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नोकरदारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना आपण राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या गोपाळकाल्याला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नोकरदार वर्गाला दहीहंडीची अधिकृत सुट्टी मिळणार आहे.
मुख्यमंत्री देणार सूचना
गोपाळकाला किंवा दहीहंडी उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. या दिवशी राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिका-यांकडून सुट्टी जाहीर करण्यात येते. पण मी राज्याच्या मुख्य सचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
(हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जानव्याचे महत्व सरकारी पुस्तकातून वगळले)
निर्बंधांची हंडी फुटली
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव हे यंदाच्या वर्षी निर्बंधांशिवाय साजरे करण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. कोरोनामुळे गेले दोन वर्ष कुठलेही सण-उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरे करता आले नाहीत. पण आता कोरोनाचे संकट कमी होत असल्यामुळे यावर्षी उत्सवांवरील निर्बंध हटवण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community