चांदणी चौकातील जुना पूल वाहतुकीस बंद; १८ सप्टेंबरला १० सेकंदात होणार जमीनदोस्त

चांदणी चौकातील जुना पूल आता १८ सप्टेंबरला पाडण्यात येणार आहे. पाऊस व वाहतुकीच्या नियोजनानुसार तसेच तज्ज्ञांच्या सूचनेनुसार हा पूल पाडण्यात येईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे. जुन्या पुलावरील वाहतूक मंगळवारपासून बंद करण्यात आली असून मुळशीवरून येणाऱ्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : केंद्र सरकार देणार दिवाळी गिफ्ट; LPG सिलेंडर स्वस्त होणार?)

१० सेकंदात पाडणार पूल 

हा पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल १० सेकंदात पाडण्यात येणार आहे.

पूल मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद 

चांदणी चौकातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे व सेवा रस्त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणजेच अरुंद पूल आता १८ सप्टेंबरला पाडण्यात येणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेला पाऊस व रस्त्यावरील प्रत्यक्ष वाहतूक याचा विचार करूनच याबाबतचा निर्णय संबंधित कंपनी घेईल अशी माहिती एनएचआयएचे अभियंता संजय कदम यांनी दिली.

हा पूल पाडण्याचे कंत्राट दिलेल्या नोएडा येथील कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूल पाडण्यासाठी पूलाला स्फोटके लावण्यासाठी दोन दिवसांपासून ड्रिलिंग सुरू केले आहे. हे ड्रिलिंग संपल्यावर हा जुना पूल मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यावरील वाहतूक नवीन पुलावरून सुरू करण्यात आली आहे. जुन्या पुलावरील पाइपलाइनचे काम अजून सुरू आहे, याबाबतचे वाहतूक व्यवस्थापन पूर्ण झाले आहे अशी माहितीही अभियंत्यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here