माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने राज्यातील अनेक गणपती मंदिरांमध्ये आणि काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. माघ गणेशोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ज्यामुळे दैनंदिन वाहतुकीच्या मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये माघी गणेश जयंतीची धूम असल्याने वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत.
पुण्यातील शिवाजी मार्गावर असणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे भक्तांची पहाटेपासूनच रिघ पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळी 6 वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदर परिसरातील गर्दी कमी होत नाही, तोपर्यंत हे आदेश लागू असणा आहेत. ज्यामुळे या मार्गाने जाणा-यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
( हेही वाचा: गोंदियात मध्यरात्री जिल्हा परिषदेच्या शाळेला आग )
सदर मार्गावर वाहतूक बंद असली तरीही अग्नीशमन दलाच्या गाड्या, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि काही अत्यावश्यक सेवेतली वाहनांना या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे.
जड वाहतूक बंद
पुण्यातील स.गो. बर्वे चौकातून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणा-या सर्व प्रकारची जड वाहतूक बंद असेल. तर प्रिमियम गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोर तूर्तास नो- पार्किंग, नो-हाॅल्टींग लागू करण्यात आले आहे.
मुंबईत या मार्गांत बदल होण्याची शक्यता
मुंबईतही प्रभादेवी येथे असणा-या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरात येणा-या भक्तांची गर्दी लक्षात घेता इथेही वाहतुकीत काही बदल केले जातील. ज्यामुळे दादर, प्रभादेवी स्थानकांच्या दिशेने जाणा-यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. तर, सिद्धीविनायकच्या दिशेने येणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरु असेल. सायंकाळी सदर परिसरात मिरवणूक निघणार असल्याने वाहतूक एकाच मार्गिकेवरुन सुरु ठेवली जाऊ शकते.