पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे करोनाने निधन

एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी व पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळे प्रशासकीय व माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

पुणे जिल्ह्यातील  माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे ५ वाजता कोरोनामुळे दुःखद निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यावर मागील ७ दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी व पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळे प्रशासकीय व माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

२६ मार्च रोजी कोरोनाची लागण झालेली! 

चार दिवसांपूर्वी सरग यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला. खबरदारी म्हणून २६ मार्च रोजी त्यांनी करोना चाचणी करून घेतली. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तातील साखर वाढल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.

(हेही वाचा : शरद पवार रुग्णालयातून घरी परतले! राज्याचा गाडा रुळावर येणार का? )

बढतीची संधी हुकली!

मागील वर्षी कोरोना काळात सरग हे स्वतःच्या सहकाऱ्यांना घेऊन फिल्डवर राहून जनसेवा केली होती. नुकतेच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सजग यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला होता. राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. व्यंगचित्र रेखाटन हा त्यांचा छंद होता. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते मोफत व्यंगचित्र करून देत असत. मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळं त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. प्रशासकीय कौशल्य व आजवरचे काम पाहून येत्या आठवड्यात सरग यांना बढती दिली जाणार होती. मंत्रालयातून तशी माहिती देण्यात आली होती. दुर्दैवानं त्यांची ही संधी हुकली. राजेंद्र सरग यांची पत्नी व एका मुलाला देखील करोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here