पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या एस.व्ही.एस या सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 18 कामगार जाळून खाक झाले. या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याने मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीच्या मालकाकडून कमालीचा निष्काळजीपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. पौड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
(हेही वाचा : राज्यात एका महिन्यात तब्बल १० हजार बेरोजगारांना रोजगार)
गृहमंत्री वळसे-पाटील, सुप्रिया सुळेंकडून पाहणी
मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकाळी दुर्घटनास्थळी आले होते. आगीत भस्मसात झालेल्या कंपनीची पाहणी केल्यानंतर वळसे-पाटील यांनी मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, रुपाली चाकणकर, संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ,जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वळसे-पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली.
उरवडे,ता.मुळशी येथे फॅक्टरीला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर तेथे आज राज्याचे गृहमंत्री श्री @Dwalsepatil समवेत भेट दिली. यावेळी प्रत्यक्षदर्शी व्यक्तींशी संवाद साधला. त्यानंतर या घटनेत दगावलेल्या गीता दिवाडकर यांच्या कांजनेवस्ती येथील घरी जाऊन पिडित कुटुंबांचे सांत्वन केले. pic.twitter.com/Kw6C8DHool
— Supriya Sule (@supriya_sule) June 8, 2021
तपासासाठी चौकशी समिती नियुक्त
ही आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
Join Our WhatsApp Community