गणेशोत्सव काळात विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक देखावे,प्रबोधनपर नाटकांची सुरुवात पुण्यापासून झाली. त्यानंतर इतर शहरात या प्रथेचे अनुकरण केले जाऊ लागले, मात्र आता काळ बदलला आहे. याचे भान ठेवून सर्व मंडळांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची परंपरा सुरू करावी, असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याशिवाय कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळे परस्पर समन्वयातून जो विधायक निर्णय घेतील, त्याबाबत अधिकाधिक योग्य कृती करण्याचा प्रयत्न प्रशासन करेल, अशी खात्रीही त्यांनी मंडळांना दिली आहे.
(हेही वाचा -)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा -2022 पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पुणे शहराला स्वत:ची अशी शिस्त आहे. त्यामुळे व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सर्वच क्षेत्रांत पुणे विस्तारत चालले आहे. वेळोवेळी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन शहर अस्थिर करण्याचे काम सध्या सुरू आहे. अशावेळी गणेशोत्सव मंडळांची भूमिका महत्त्वाची आहे. या मुद्द्याकडे त्यांनी कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.
या पारितोषिक वितरण सोहळ्याला पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अंकुश काकडे, परिमंडळ 1 चे उपायुक्त संदीपसिंह गिल,परिमंडळ -2 च्या उपायुक्त स्मार्तना पाटील, अॅड.प्रताप परदेशी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार नाना पेठेतील साखळपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाला प्रदान करण्यात आला. मागील 42 वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने द्वितीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने चौथे तर भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेत सहभागी झालेल्या 152 मंडळांपैकी 104 मंडळांनी पारितोषिके मिळवली असून, एकूण 14 लाख 31 हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community