पुण्यातील जम्बो कोविड सेंटर प्रशासन ताब्यात घेणार

85

पुण्यामध्ये मोठा गाजावाजा करीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयातील असुविधांवरुन मागील दोन दिवसांपासून गोंधळ उडालेला असतानाच आता या रुग्णालयातील कर्मचारी बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जम्बो कोविड सेंटर आता प्रशासन स्वत:च्या ताब्यात देखील घेणार आहे. तसेच लाईफ लाईन या कंत्राटदाराकडील जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. दरम्यान लाईफ लाईनने भरलेल्या  कर्मचाऱ्यांपैकी ४० डॉक्टर आणि ८० नर्सेसना कामावरून कमी केल्याची माहिती मनपा उपायुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

पालिका अधिकाऱ्यांकडे जबाबदारी

याच जम्बो हॉस्पिटलमध्ये टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर या कोविड सेंटरचा कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी लाईफ लाईनला जमत नसेल तर त्यांच्या जागी दुसऱ्या संस्थेला काम देण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने ही पावले उचलली जात आहेत. पुणे महानगरपालिकेने चार अधिकाऱ्यांना जम्बो कोविडची जबाबदारी दिली असून, प्रत्येकी सहा तासांची ड्युटी या अधिकाऱ्यांना लावली असून, दोन अधिकारी राखीव ठेवलेले आहेत.

कुणीही जबाबदारी झटकू शकत नाही

पुणे शहरातील करोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता. शिवाजीनगर येथील सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर राज्य सरकार, पीएमआरडीए आणि महापालिकेच्या निधीतून ८०० बेडचे भव्य रूग्णालय उभारले गेले. यामध्ये ६०० ऑक्सिजन बेड आणि २०० आयसीयू बेड असतील, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ३०० ऑक्सिजन बेड आणि ३० आयसीयू बेड उपलब्ध आहेत.  पांडुरंग रायकर आणि अन्य नागरिकांचे आजवर इथे बळी गेले आहेत. त्यामुळे या रुग्णालयातील त्रुटी समोर आल्या असून, बैठकीत सर्व मुद्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे जम्बो रूग्णालयामधील घटनांबाबत कोणीही जबाबदारी झटकता कामा नये, तर सर्वांनी त्रुटी दूर करून काम करण्याची गरज आहे, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली.

 जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी

  • ८०० बेडसाठी आवश्यक वैद्यकीय तज्ञ अधिकारी वर्ग व वैद्यकीय कर्मचारी मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही
  • जम्बोमधील रुग्णांना नाश्ता व जेवण वेळेत मिळत नाही
  • डेडबॉडी मॅनेजमेंट व्यवस्थित होत नसल्याने आयसीएमआर पोर्टलवर नोंदणी करणे शक्य होत नाही
  • संशयित रुग्णांकरिता ५० बेड उपलब्ध करण्याचे निर्देश असूनही केवळ दहाच बेड उपलब्ध आहेत
  • डेटा एंट्री ऑपरेटर पुरेशा प्रमाणात नाहीत
  • बाधित रुग्णांना दाखल करुन घेणे अपेक्षित असतानाही ओळख व रुग्णाचा इतिहास उपलब्ध नसल्याचे कारण देत दाखल करुन घेतले जात नाही
  • कर्मचाऱ्यांचे अद्ययावत हजेरीपत्रक उपलब्ध नाही
  • एएए हेल्थकेअर पुणे प्रिन्सिपल कन्सल्टंट यांचे लाईफलाईन व अन्य यंत्रणांवर नियंत्रण नाही.
  • मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्ण दाखल करुन घेण्यास अधिक वेळ लागतो.
  • सर्व संबंधित यंत्रणांमध्ये आपसात समन्वय नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.