भटक्या कुत्र्यांप्रमाणेच आता मांजरींचीही नसबंदी करण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, हा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांकडून सांगण्यात येत आहे. मांजरींचा वाढता उपद्रव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मांजरींच्या नसबंदीचा निर्णय
केंद्र शासनाच्या अॅनिमल वेल्फेअर बार्डाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांना आता कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे. त्यानुसार भटक्या मांजरींना पकडणे, त्यांचे लसीकरण करणे आणि त्यांच्या कुटुंब नियोजनासाठी प्रयत्न करणे हा उपक्रम पुणे महापालिकेकडून घेण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून हा उपक्रम महापालिकेकडून राबवण्यात येत आहे. नसबंदी केल्यानंतर मांजरींना पुन्हा सोडून देण्यात येणार आहे. पुणे महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः EPFO: पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी, पेन्शनच्या नियमांमध्ये ‘हा’ बदल झाल्यास होणार मोठा फायदा)
उपद्रव टाळण्यासाठी निर्णय
पुणे शहरात भटक्या कुत्र्यांसह मांजरींची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत असून, मांजरींची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सध्यातरी भटक्या मांजरींच्या नसबंदीबाबत निर्णय घेण्यात आला असून, पाळलेल्या मांजरींच्या नसबंदीबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून याआधी याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुणे महापालिकेकडूनही ही उपाययोजना राबवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community