पुणे महानगरपालिकेची कामे आता व्हॉट्सॲपवर! चॅटबॉट सेवेचा विस्तार

पुणे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासह नागरिकांना अनेक प्रकारच्या सेवा घरबसल्या एका क्लिकवर मिळाव्यात, या उद्देशाने महापालिका प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी मिळकतकर विभागासाठी चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सेवेचा विस्तार करण्यात आला असून, आता त्यात, घनकचरा, उद्यान विभाग, पाणी पुरवठा, अग्निशमन, आरोग्य विभाग अशा 80 सेवा देण्यात येणार आहेत. यामुळे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन संबंधित विभाग शोधणे, अर्ज करणे या अवघड प्रक्रियेतून नागरिकांची मुक्तता होणार आहे. त्यासाठी नागरिकांना या सुविधा 88882510 या व्हॉट्सअप क्रमांकावर मिळणार आहेत. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ही माहिती दिली. यावेळी महापालिकेच्या संगणक विभागाचे प्रमुख राहुल जगताप उपस्थित होते.

( हेही वाचा : एसटी चालकाला आला हार्ट अटॅक आल्यावर प्रवाशाने सांभाळले स्टेरिंग आणि… )

पुणे मनपा आता व्हॉट्सॲपवर! 

सेवेचे विस्तारीकरण करत यात 19 विभागांचा समावेश केला आहे. मिळकतकर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलकाचा परवाना आणि परवानगी, कुत्रा पाळणे परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, नळजोडणी अर्ज, नवीन नळजोडणी करिता आवश्यक कागदपत्रे, मलःनिस्सारण जोड, प्लंबिंग लायसन्स, लायसन्स नूतनीकरण ही सेवा उपलब्ध आहे. याशिवाय या चॅटबॉटवर मृत्यू दाखला, विवाहनोंदणी प्रमाणपत्र, मिळकत ना हरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तांतरण, वारसा हक्क हस्तांतरण आवश्यक कागदपत्रे, अग्निशमन प्राथमिक व अंतिम ना हरकत प्रमाणपत्र, तक्रार दाखल करणे, तक्रारीची सद्यस्थिती पाहणे ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here