पुणे शहरातील अरुंद रस्ते आणि गर्दीच्या मार्गावर धावण्यासाठी पीएमपीने घेतलेल्या ७० मिडी बस इंजिन दुरुस्तीअभावी गेल्या सात महिन्यांपासून जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून घेतलेल्या या मिडी बस डेपोत ठेवण्यासाठी आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
( हेही वाचा : पुण्यातील गणेश मंडळांचे ऐतिहासिक पाऊल! सात मंडळांचे बाप्पा एकाच रथात विराजमान होणार)
७० मिडी बस बंद
शहरातील अरुंद रस्ते आणि गर्दीच्या मार्गावर पीएमपीच्या मोठ्या बसमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी पीएमपी प्रशासनाने ताफ्यात टप्प्याटप्प्याने २३३ मिडी बस खरेदी केल्या. मात्र, सद्यस्थितीत इंजिन दुरुस्तीअभावी यातील ७० मिडी बस बंद असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या सात महिन्यांपासून या बसेस बंद आहेत. त्या पुणे शहरातील विविध डेपोंमध्ये उभ्या आहेत. या बस नव्याने ताफ्यात दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच बंद पडू लागल्या. त्यातच या बसचे सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने त्या अनेक महिने एकाच जागेवर उभ्या राहत होत्या. त्यामुळे ‘पीएमपी’ने या बससाठी लागणारे सुटे भाग तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी मुख्यालयात एक स्वतंत्र काउंटर सुरू केले.
प्रवासी नाराज
मात्र या काउंटरवरून एकही स्पेअरपार्ट उपलब्ध होऊ न शकल्याने ते अखेर बंद करण्यात आले. यानंतर या गाड्या बंद स्थितीत आहेत. एकीकडे प्रवाशांसाठी बस कमी पडत असताना कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेल्या बस काही महिने बंद असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community