पीएमपीएमएल बसगाड्या पुरवणारा कंत्राटदार संपावर गेल्याने सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. कंत्राटदारांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे शहरात पीएमपीएमएल बस गाड्यांची संख्या कमी झाली आणि यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.
कंत्राटदारांनी पुकारला संप
बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांचे तीन महिन्यांपासून बिल थकल्यामुळे ४ कंत्राटदारांनी अचानक संप पुकारला आहे. याचा थेट फटका पुणेकरांना बसला असून रविवारी संध्याकाळी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पुण्यात अनेक लोक PMPML ने प्रवास करतात. त्यामुळे सोमवारी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दैनंदिन कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचायला सुद्धा उशीर झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पैसे मिळालेले नाहीत, इंधनाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही कुठून घ्यायचे असा सवाल करत या कंत्राटदारांनी संप पुकारला आहे.
पीएमपीएमएलकडे सध्या २ हजार १४२ बसेस आहेत. यापैकी १ हजार १०० बसेस या कंत्राटदारांच्या असून इतर ९०० बसेस या पीएमपीएमएलच्या मालकीच्या आहेत. कंत्राटदारांनी अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा वेळेवर थकबाकी देण्यात आली नसल्याने अखेर ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाईम, हंसा, अँथोनी या कंत्राटदारांनी संप पुकारला आहे.