अमेरिकेत बीक्यू.१ या ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. अमेरिकेतून प्रवास केलेल्या रुग्णामुळे भारतात सुद्धा आता बीक्यू.१ व्हेरिएंट आल्याचे तपासाअंती समोर आले आहे. पुण्यात हा रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केले. हा रुग्ण आता बरा झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. यासह पुण्यात एक्सबीबी या व्हेरिएंटचे तब्बल १३ रुग्ण आणि बी. ए. २.३.२० व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला. एक्सबीबी हा व्हेरिएंट रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी करतो. तर बी.ए. २.३.२० सौम्य स्वरुपाचा व्हेरिएंट आहे.
( हेही वाचा : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीच्या आधी मिळणार)
२४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांच्या झालेल्या जनुकीय चाचणीच्या अहवालात ही माहिती उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वीच राज्यात एक्सबी, बीक्यू.१ आणि बी.ए.२.३.२० हे तीन विषाणू आढळल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते. या बाबतीत तपशीलवार माहिती बुधवारी आरोग्य विभागाने दिली. एक्सबी व्हेरिएंटचे तेरा रुग्ण पुण्यात तर नागपूर आणि ठाण्यातही प्रत्येकी दोन रुग्ण सापडल्याचे अहवालातून समोर आले. अकोल्यात एक्सबीची बाधा झालेला एक रुग्ण सापडला आहे. राज्यात एकंदरीत कोरोना रुग्णांची संख्या पाहता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत नसल्याचे आकडेवारीतून निदर्शनास आले आहे. गेल्या आठवड्याभरापासून ९७.१४ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नोंदवले जात आहे.
- राज्यात तीन नव्या व्हेरिएंटचे २० रुग्ण सापडले. त्यापैकी १५ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.
- उर्वरित पाच रुग्णांची माहिती संकलन करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे.
Join Our WhatsApp Communityअमेरिकेतील ११ टक्के रुग्ण बीक्यू.१ व्हेरिएंटचे आहेत. भारतीयांचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु आहे. तिन्ही नवे व्हेरिएंट ओमायक्रोनचे असून, सौम्य स्वरुपाचे आहेत. लोकांनी काळजी करण्याचे कारण नाही, आवश्यक नियमांचे पालन करावे.
डॉ. प्रदीप आवटे, प्रमुख, साथरोग विभाग, आरोग्य विभाग.