पुणे रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवण्याची धमकी देणा-याला अटक; रागात फोन केल्याची आरोपीची कबूली

79

पुणे रेल्वे स्थानक (Pune railway Station) बाॅम्बने उडवण्याची धमकी (bomb threat) देणा-या व्यक्तीला पोलिसांनी मनमाडमधून अटक केली आहे. पुणे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यामागील संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा या अटकेमुळे झाला आहे. रेल्वेच्या बोगीत झालेल्या एका भांडणामुळे ही धमकी दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. रागात केलेल्या फोन काॅलमुळे हा सारा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवण्याची धमकी आल्याने, एकच खळबळ उडाली होती.

पुणे रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने, पोलीस यंत्रणा सतर्क झाली. प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. डाॅग स्काॅडच्या मदतीने संपूर्ण रेल्वे स्थानकाची तपासणी केल्यानंतर स्थानकामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याचे स्पष्ट झाले. धमकी देणारा फोन मनमाडमधून आल्याने पोलिसांनी फोन करणा-याला अटक करण्यासाठी मनमाडच्या दिशेने धाव घेतली.

( हेही वाचा: वाशी पुलावरील वाहतूक बंद; मुंबईला जाणा-या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी )

का दिली धमकी? आरोपीची कबूली

फोनसंदर्भातील माहितीच्या आधारे कात्रज परिसरातून पोलीस निरिक्षक भिडे आणि एलसीबी पोलिसांनी फोन करणा-या गोविंद मांडेला अटक केली. मांडे हा शुक्रवारी रात्री मनमाड ते पुणे असा प्रवास करत असताना, झालेल्या एका वादातून ही खोटी माहिती दिल्याचे त्याने कबूल केले. बोगीमध्ये पोलिसांप्रमाणे दिसणा-या दोन व्यक्तींबरोबर गोविंदाचे भांडण झाले. याच रागातून गोविंदने 112 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. हा काॅल त्याने मनमाड रेल्वे स्थानकातून केला. काॅल चालू असतानाच या दोन इसमांनी गोविंदच्या हातून फोन खेचून घेत, आम्हाला दहशतवादी हल्ल्यांचे काम करायचे असते आता आम्ही 142 किलोमीटर ते 150 किलोमीटर या ठिकाणी काम करणार आहोत, असे म्हटले. हे सारे संभाषण नियंत्रण कक्षामध्ये रेकाॅर्ड झाले आणि पोलीस सक्रीय झाले. त्यांनी तातडीने मनमाडला जाऊन गोविंदला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सारा प्रकार समोर आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.