पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाशीम जिल्ह्यातून आलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर ट्रॅव्हल बसमध्ये बलात्कार करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले आहे.
पीडित तरुणी ही वाशीम जिल्ह्यातून आपल्या पतीसोबत पुणे येथे आली होती. पुण्यात राहण्यासाठी हे दाम्पत्य घर शोधत होते. त्यांची ही परिस्थिती लक्षात घेता बलात्कार करणा-या आरोपीने महिलेला ट्रॅव्हल बसमध्ये झोपण्यास सांगितले. त्यानंतर महिलेचा पती हा वॉशरुमला गेला असताना आरोपीने बस चालू करत स्वारगेट आणि कात्रज परिसरात नेऊन महिलेवर बलात्कार केला. हे निर्दयी कृत्य करणारा बसचा चालक नवनाथ भोंग(38) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची महिलेने पुण्याच्या स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
काय झाले नेमके?
पुण्यात राहण्यासाठी घराच्या शोधात असलेले हे दाम्पत्य वाशीम जिल्ह्यातून आले होते. रविवारी रात्री उशीर झाल्यामुळे हे दाम्पत्य तात्पुरत्या नावा-याच्या शोधात होते. त्यावेळी आरोपीने त्यांना आपल्या ट्रॅव्हल बसमध्येच झोपण्यास सांगितले. नाईलाजाने या दाम्पत्याने बसमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचा पती वॉशरुमला गेल्याचे पाहत या संधीचा फायदा घेत आरोपीने अचानक बस सुरू केली.
दोन वेळा बलात्कार
त्यानंतर बस स्वारगेट परिसरात नेऊन तेथील एका निर्जन फूटपाथवर त्याने महिलेवर बलात्कार केला. पुन्हा ही बस त्याने कात्रज परिसरात नेऊन तेथील एका फुटपाथवर त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान महिलेच्या पतीने आपल्या पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यासाठी पोलिसांत धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला.